Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2025 10:29 IST2025-11-05T10:28:24+5:302025-11-05T10:29:53+5:30
Astrology: आयुष्यातील अडचणी अनेक मार्गांनी सोडवण्याचा प्रयत्न करतो, अगदी ज्योतिष शास्त्राचीही मदत घेतो; पण अध्यात्माचे पारडे त्याहून जड असते का?

Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
उत्तम ज्योतिषाचे मार्गदर्शन हे मुळात भाग्यात असावे लागते. अनिष्टसुद्धा आपण टाळू शकत नाही आणि इष्टसुद्धा. जेव्हा अनिष्ट टळणार नसते तेव्हा उत्तम ज्योतिषाच्या घराच्या पायऱ्या जातक चढणारच नाही, तशी बुद्धीही होणार नाही कारण योग्य मार्गदर्शन मिळणे हे त्याच्या नशिबात नसते. शेवटी ज्याचे त्याचे प्राक्तन असते आणि काही भोग भोगूनच संपवायचे असतात. अनेकदा उपासना करून ते भोगायची शक्ती मिळते पण तरीही ते भोगायलाच लागतात.
अनेक पत्रिका बघितल्यावर मी जातकाला विचारते की ह्या आधी ज्योतिष मार्गदर्शन घेतले नव्हते का ? जातक अनेक पूजा, शांती करतात. त्या कुणीतरी सांगितल्या म्हणून, पण मग त्याचा उपयोग का होत नाही ? त्या शांती, उपाय पूजा ह्यांची खरेच गरज आहे का त्या पत्रिकेला? एखादी गोष्ट होईल ह्या आशेने माणूस त्यासाठी हजारो रुपये खर्च करतो, पण मग त्याचा फायदा जेव्हा होत नाही तेव्हा अनेकदा हे शास्त्र बदनाम होते किंवा लोकांचा शास्त्रावरचा विश्वास उडतो. जातक सुद्धा उपाय विचारतात पण किती जण ते करतात?
परवा एका जातकाला नामस्मरण आणि हनुमान चालीसा म्हणा त्याचे अपरिमित फायदे आहेत हे कितीवेळ समजावले. फोन ठेवताना त्यांनी विचारले कुठले रत्न घालू का? मी डोक्याला हात लावला. म्हणजे नाम घ्यायचे नाही कारण ते कष्टाचे काम आहे. रत्न सोपे आणि मिरवायला मोकळे. मनात नसतानाही ते लिहावे लागत आहे कारण ते सत्य आहे. असो.
ज्योतिष सांगणे ही सुद्धा एक जबाबदारी आहे. आपल्या जातकाला त्याला अपेक्षित नाही तर ग्रहांच्या मनातील संकेत जातकाला खरे तेही खुबीने सांगावे लागतात. जातक मोठ्या आशेने ज्योतिषाकडे आपला प्रश्न घेऊन येतो आणि त्याला त्याच्या कानाला गोड लागेल, थोडक्यात त्याला अपेक्षित उत्तर ऐकायचे असते. पण तसे असते तर अजून काय हवे होते? त्यामुळे एखादी घटना जरी घडणार नसेल तरी ती सांगताना जातकाच्या मनाचा विचार करून खुबीने ती सांगावी लागते, कारण नकार ऐकण्याची त्याची मानसिकता नसते. सगळे गोड गोड हवे असत, नकारात्मक उत्तर किंबहुना सत्य ऐकण्याचे आणि ते स्वीकारण्याचे धाडस फार कमी लोकांच्यात असते.
Astro Tips: कडक मंगळाची पत्रिका म्हणजे नेमके काय? ती व्यक्ती तापदायकच असते का? वाचा
कमी बोलणारा ज्योतिषी कुणालाही आवडत नाही, कारण आपल्या पत्रिकेबद्दल भरभरून बोलावे असे प्रत्येक जातकाला वाटते. परवा एका काकूंना मुलाचे लग्न अजून दोन वर्ष होणार नाही, पण मग मात्र नक्कीच होईल असे सांगितल्यावर त्या जरा नाराज झाल्या कारण प्रत्येक आईला आपल्या मुलांची लग्ने आज अगदी आत्ता व्हायला हवी असतात. मग त्यांना म्हटले, अहो विवाह योग पत्रिकेत नाही असे नाही, थोडा उशीर आहे इतकेच हे समजून घ्या. उशिरा होउदे, पण आयुष्यभर तो सुखात राहूदे हे आपण बघुया.
आजकाल थोडे थोडे वरवरचे वाचून आपण आपली मानसिकता तयार करतो, खरेतर ते ज्ञान अर्धवट असते आणि मग ज्योतिषाकडे जाऊन प्रश्न विचारण्याच्या ऐवजी समस्या न सांगता माझी राहूची दशा आहे मग आता काय? हे सुरु होते. शास्त्राचा अभ्यास खूप सखोल आहे. त्यात जीव ओतावा लागतो, अक्षरशः सर्व जीवन शास्त्राचा ध्यास घ्यावा लागतो, कारण ज्योतिषी सुद्धा माणूस आहे आणि तोही चुकू शकतो. त्यामुळे मी सर्वज्ञ अशा बढाया कुणीही मारू नये. आपल्या ज्ञानावर आणि सद्गुरूंच्या वरती संपूर्ण निष्ठा, श्रद्धा असेल तर भाकीत सांगताना त्याची नक्कीच जोड मिळते हा माझा स्वतःचा अनुभव आहे. अनेक वेळा पत्रिकेत न घडणाऱ्या गोष्टी सुद्धा घडतात कारण गुरूंचा आशीर्वाद.
अशक्यातून शक्य असलेल्या गोष्टींकडे प्रवास चालू होतो तो ह्याच विश्वासावर. हा अभ्यास अविरत चालू राहिला पाहिजे. कारण आपण अभ्यासक आहोत. प्रत्येक पत्रिका हे ज्योतिषासमोर असलेले एक आव्हान आहे. ग्रहस्थिती आणि समस्या ह्यांचा मेळ घालता आला पाहिजे. पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष आयुष्य ह्यात साम्य असेलच असे नाही. कुठे कुठला नियम लागतो ते आधी समजले पाहिजे. उगीच लग्नी गुरु आला म्हणजे विवाह होईल हे भाकीत करणे चुकू शकते.
सिनेमात कसे असते ना, शेवटी ज्याच्यावर संशय असतो तो खलनायक नसतो, भलताच कुणीतरी असतो. अगदी तसेच राहू शनी ह्यांच्यावर आपण ठपका ठेवतो, पण भलताच ग्रह खरे कारनामे करत असतो तो आपल्याला शोधता आला पाहिजे. थोडक्यात पत्रिकेची नस ओळखता आली पाहिजे. अनेकदा एखादा ग्रह जो कधीही मदत करत नाही तोही मदतीला धावून येतो. मी स्वतः फार ज्योतिष ज्योतिष करत नाही. नामस्मरण आणि उत्तम कर्म, कुळाचार ह्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आपली चुकीची कर्म ग्रहांना आपल्या आयुष्यात समस्या निर्माण करायला कारणीभूत ठरतात . ग्रह हे फक्त आपल्या कर्मांचे प्रतिनिधित्व करत असतात. तेव्हा एखादी समस्या निर्माण झाली किंवा वाईट गोष्ट झाली तर त्याचे खरे कारण आपल्या अंतर्मनाला पहिल्या काही सेकंदात समजते पण ते मान्य करायचे धाडस आपल्यात नसते हे १००००००% खरे आहे . विचार करा तुम्हाला नक्की पटेल.
आपल्याला शास्त्राचे किती ज्ञान आहे ह्याचा टेंभा जाताकासमोर मिरवायची गरज नसते. आपण किती पाण्यात आहोत हे आपल्या गुरूना माहित असते. त्यामुळे समोरच्यावर आपली छाप वगैरे पाडायच्या भानगडीत न पाडता जातकाला योग्य मार्गदर्शन करून समस्येतून बाहेर कसे काढता येईल ते पाहावे . पत्रिका बघताना एखादे अनिष्ट समोर दिसले तरी ज्योतिषाने शास्त्राचा मान ठेवून विचारल्याशिवाय सांगू नये, कारण शेवटी समोरचा ऐकत नाही आणि होनी को कौन टाल सकता है? ह्याची परिणीती मिळाल्याशिवाय राहत नाही.
विवाह, वास्तू, परदेशी शिक्षण ह्यासारख्या आयुष्य बदलवणाऱ्या गोष्टीसाठी शास्त्राचा आधार महत्वाचा वाटतो, नव्हे तो असतोच. समस्या निर्माण झाल्याशिवाय प्रश्नही विचारू नये आणि ज्योतिषाने फक्त आपले मानधन मिळाले म्हणून सांगूही नये. एका जातकाने आपल्या १८ वर्षाच्या मुलीच्या विवाहाचा प्रश्न विचारला. विवाह आज करायचा नाही, तसेच तिचे ते वय नाही. सध्या शिक्षण, नोकरी ह्यात अनेक वर्ष जातील. मुलगी आर्थिक, शारीरिक, मानसिक, वैचारिक आणि लैंगिक दृष्टीने विवाहाला योग्य झाली की स्थळे बघुया.
ज्योतिष आणि अध्यात्म ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. साधनेने वाणीचे सामर्थ्य वाढते. जिथे ज्योतिष संपते तिथे अध्यात्म सुरु होते आणि अध्यात्मात गेलेल्या लोकांनी मागे वळून ज्योतिषाकडे पाहू नये असे गोगटे काका मला नेहमी सांगत. महाराजांचा वरदहस्त त्यांची कृपा झाली की अजून काय हवे? त्यानंतर आपले आयुष्य कसे असायला हवे ते फक्त तेच ठरवतात. मी स्वतः ह्याचा अनुभव कित्येक वर्ष घेत आहे. भाग्यात नशिबात नसलेल्या अनेक गोष्टी प्राप्त होतात ते फक्त आणि फक्त सद्गुरू कृपेमुळे ह्याचा अनुभव आहेच आहे. दिवस आनंदात उत्तम कर्म करण्यात घालवावा, काही वेळ परमेश्वरी चिंतन आणि नाम घ्यावे, आजचा क्षण अतिशय महत्वाचा आहे आणि त्या क्षणाचा आनंद घ्यावा. सतत भूतकाळात, कटू आठवणीत रमलेले मन नामस्मरणाने वास्तवात आणण्यास मदत होते. ह्या दैवी आणि अभूतपूर्व शास्त्राचे वेळेआधी मिळणारे संकेत किबहुना योग्य वेळी मिळणारे संकेत गुरुकृपेनेच मिळतात आणि आयुष्य राजमार्गावर मार्गस्थ होते ह्यात दुमत नसावे.
हा लेख लिहिताना एका भक्ताचा अक्कलकोट हून फोन आला उद्या video call करून दर्शन घेणार आहे . डोळ्यात फक्त अश्रू आहेत. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय....स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय!
श्री स्वामी समर्थ
संपर्क : 8104639230