Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:33 IST2025-04-22T15:32:34+5:302025-04-22T15:33:08+5:30

Astro Tips: अशी अनेक जोडपी आपल्या परिचयात असतील ज्यांना संतती हवी आहे पण लाभत नाही; त्यासाठी कुंडलीत कोणता विशिष्ट योग असतो? सविस्तर वाचा. 

Astro Tips: Why do many couples not have children despite their desire? Find out! | Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

मध्यंतरी एका जातकाचा फोन आला प्रश्न होता, संततीसाठी! त्यांना म्हटले सून आणि मुलगा दोघांच्याही पत्रिका पाठवा. त्यावर म्हणाल्या मुलाची कशाला? मुल सुनेला होणार तिची पुरेशी नाही का? मी त्यांना म्हटले, विवाह दोघांचा म्हणून अपत्यही दोघांचे म्हणून दोघांच्याही पाठवा. तसेच पुढे जावून सांगावेसे वाटते घटस्फोटच्यासुद्धा केसमध्ये दोघांच्या पत्रिका हव्यात, शेवटी विवाह दोघांचा आहे. 

मुल स्त्री जन्माला घालणार त्यामुळे ते झाले नाही किंवा त्यात काही अडचणी आल्या तर अर्थात सर्व दोष स्त्रीचा हे पूर्वापारपासून आपल्या मनावर, मेंदूवर जणू बिंबवले गेले आहे. शाळेपासून आपण शिकलो आहोत XX आणि XY गुणसूत्रे. पण म्हणतात ना, मागचे पाढे पंचावन्न! कितीही शिकलो तरी आपल्या पुरुष प्रधान संस्कृतीत पुरुष टेस्ट करायला सुद्धा तयार नसतात असे अनेकदा पाहायला मिळाले आहे . मध्यंतरी एक पत्रिका आली होती . त्या जातक स्त्रीने सांगितले की काही प्रमाणात दोष त्यांच्या पत्रिकेत आहे आणि तो त्यांनी आणि मीही स्वीकारला आहे. क्षणभर मला काय बोलावे सुचेना , खूप प्रयत्न करून झाले होते देवाचे सर्व उपाय आणि IVF सुद्धा . मला त्यांच्या दोघांच्याही खरेपणाचे कौतुक वाटले. ही खरी जोडी असे अनेकदा मनात आले. एकमेकांच्यातील त्रुटी स्वीकारून ते संसार करत होते . किंतु परंतु बाजूला ठेवले होते. हे सर्व करायला पण किती मोठे मन लागते...

विवाह हा वंश वाढवण्यासाठी केला जातो हे वेगळे सांगायला नको. विवाह बंधनात अडकणे हे आयुष्यभराचे बंधन आहे पण त्यात गोडवा आहे. कुठल्याही गोष्टीना बंधन किंवा वेष्टण नसेल तर सर्वच बेधुंद होईल. तसे होऊ नये म्हणून शास्त्राने हा विवाह बंधनाचा संस्कार दिला आहे. 

जोडीदाराबद्दल प्रेम आदर असेल तर सप्तम फुलते आणि त्याची परिणीती पंचमातील फळ म्हणजेच संतती मिळण्यात होते . म्हणूनच पत्रिकेत सर्वात महत्वाचा आहे तो चंद्र मनाचा कारक ग्रह . एखाद्या स्त्रीला आणि पुरुषाला आत्यंतिक मनापासून अपत्याची जेव्हा ओढ लागते तेव्हा त्यांचा प्रणय खऱ्या अर्थाने फुलतो आणि गर्भ धारणा होते . गर्भ वाढवताना स्त्रीचे सुद्धा नवीन आयुष्य बहरत असते. घरातील सर्वांनी घेतलेली काळजी आणि आपल्या ह्यांनी क्षणोक्षणी दिलेली साथ स्त्रीला आणि पोटात वाढणाऱ्या गर्भाला सुद्धा सुखावत असते . 

आज संतती आणि संतती सौख्याबद्दल ज्योतिषीय दृष्टीकोनातून काही गोष्टी जाणून घेऊया. सर्वांचे आयुष्य सारखे नसते. आपले क्षणभंगुर आयुष्य परमेश्वराच्या  हाती आहे. आपल्याला काय द्यायचे आणि काय नाही ते तो ठरवणार आणि त्या त्या वेळेत ते देणार सुद्धा हा विश्वास आपल्याला जीवन जगायला पुरेसा आहे. पूर्वीचा काळ आता राहिला नाही. तेव्हा अगदी वर्षाला पाळणा हलत असे. अनेकदा आजी आई आणि लेक तिघी बाळंतीणी असत. आता तसे राहिले नाही. एक झाले तरी पुरे म्हणायचे कारण आज जीवन घड्याळ्याच्या काट्यावर आहे. आर्थिक विवंचनेत अडकलेला माणूस कुठवर पुरा पडेल ह्याची भ्रांत आहे.

अनेकांना नको असतानाही अपत्य होतात आणि अनेकांची अपत्यप्राप्तीची इच्छा अपूर्ण राहते. परमेश्वराच्या न्यायापुढे मनुष्य हतबल आहे हेच खरे . आपण कितीही आधुनिक झालो तरी अनेक गोष्टीत जुन्या रूढी तेच तेच धरून ठेवले जाते . गावातून , खेड्यापाड्यातूनच नाही तर अगदी शहरातून सुद्धा संतती सौख्य नाही म्हणून पत्नीला माहेरी धाडून दुसरा विवाह केलेल्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात . स्त्रीचा दोष नसतानाही तिला संसारापासून बेदखल केले जाते . जग कुठे चालले आहे , मंगळावर चंद्रावर जाण्याच्या गप्पा मारणारे आपण ह्या भावनिक गोष्टीत कधी बदलणार आहोत?

संतती होणे आणि संततीपासून सौख्य मिळणे ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत . संततीसाठी अहोरात्र कष्ट उपसणाऱ्या आई वडिलांना म्हातारपणी मुले सरळ वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. अशावेळी वाटते संतती साठी उपास तपास केले , पोटाला चिमटा घेवून हौस मौज बाजूला ठेवून मुलांना सर्व सुखे दिली पण आता त्यांना आपल्या पालकांचे ओझे वाटू लागले आहे. अशी संतती आपल्या निराशेला  कारणीभूत ठरते.

ज्योतिष दृष्टीकोनातून संतती म्हटली की पंचम भाव पाहावा लागतो अर्थात त्याआधी सप्तम कारण. सप्तम भावात त्या दोघांचे मनोमिलन झाले नाही तर पुढे सर्वच अटळ आहे. त्यामुळे पंचम भावातील राशी लग्न, पंचमाचे पंचम, अपत्य प्राप्तीसाठी गुरु, पंचम भावातील हर्शल नेपच्युनसारखे बाधा आणणारे ग्रह विशेष करून प्लुटो ह्या सर्वाचा अभ्यास करावा लागतो . घटना घडवणारा दशास्वामी आणि गोड बातमी देणारा अंतर्दशा स्वामी ह्यांची मंजुरी लागते. तेव्हा संतती सौख्य लाभते. 

पंचमेश कुठल्या नक्षत्रात आहे तसेच पंचम भावावरील शुभ अशुभ ग्रहांच्या दृष्टी, अपत्य जन्माला येण्याच्या वेळी असणारे गोचर भ्रमण सुद्धा विचारात घ्यावे लागते . पंचम पाप कर्तरी योगात असेल किंवा पंचम अशुभ ग्रहांनी दृष्ट असेल तर अडचणी येऊ शकतात . पंचम भावातील बुधाच्या शनीच्या राशी किंवा बुध शनी अपत्य प्राप्तीस अडथळ्यांची शर्यत किंवा विलंब करतात. पंचमेश बुध किंवा सिंह राशीत असेल तरीसुद्धा अपत्य प्राप्तीमध्ये अडचणी येतात. पंचमातील जल तत्व हे संततीसाठी उत्तम असते. पत्रिकेतील शनी राहू , गुरु राहू , गुरु नेप युती सुद्धा वैवाहिक सुखावर परिणाम करणाऱ्या आणि पर्यायाने संतती सुखावर सुद्धा परिणाम करणाऱ्या असतात. 

प्रत्येक पालक आपल्या अपत्यासाठी त्याच्या सुखासाठी जीवाचे रान करतात. आपल्या जे जे मिळाले नाही ते त्यांना मिळावे ह्यासाठी आयुष्य पणाला लावतात. अशावेळी संतती कडून त्यांना कष्ट मिळतात तेव्हा काय अवस्था होत असेल ह्याचा विचार न केलेला बरा. संतती म्हणजे त्या दोघांच्या प्रेमाच्या वेलीवर बहरलेले हवेहवेसे वाटणारे सुंदर फुल आहे त्याला ते कसे बरे कोमेजू देतील.  मुलांच्या शिक्षणासाठी दोन दोन नोकऱ्या करून पैसे जोडणारे पालक आपण बघतो तेव्हा वाटते, उत्तर आयुष्यात मुलांनी त्याचे चीज करावे. अनेकांच्या नशिबी ते सुख असते पण अनेकांची सुखाची ओंजळ रीतीच राहते .

नऊ महिने पोटातील गर्भ वाढवणे, त्याला मोठे करणे, संस्कार करणे, माणूस म्हणून घडवणे, त्याला जगाची ओळख करून देत त्याला त्याच्या पायावर उभे करणे हे एखाद्या तपापेक्षा कमी नाही. ही खरी साधना आहे आणि त्या साधनेचे फळ त्यांना त्यांच्या उतार वयात मुलांनी भरभरून द्यावे ह्यासारखे दुसरे सुख ते काय? 

संपर्क : 8104639230

Web Title: Astro Tips: Why do many couples not have children despite their desire? Find out!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.