घराबाहेर पडताना आपण 'चला जातो' असं म्हणालो की मोठी मंडळी ओरडतात आणि 'चला येतो' असं म्हणायला लावतात. घराबाहेर पडलेली व्यक्ती बाहेरच्या जगात वावरताना अनेक परिस्थितून जात असते. शारीरिक, मानसिक, आर्थिक अडचणींना तोंड देत काम संपवून घरी येते. या रोजच्या प्रवासात तिला कुठलाही त्रास होऊ नये, ती सुखरूप यावी म्हणून जातो असे न म्हणता येतो म्हणायची सवय आपल्याला लावली जाते. त्याबरोबरच आणखी एक सवय आपल्याला उपयोगी पडते, कोणती ते ज्योतिष अभ्यासक डॉ. शिरीष कुलकर्णी यांच्याकडून जाणून घेऊ.
देवाला आणि घरातल्या ज्येष्ठ मंडळींना नमस्कार करून घराबाहेर पडण्याची सवय कधीही चांगली. आपण रोज नोकरीवर जात असलो किंवा व्यवसायासाठी बाहेर पडत असलो तरी घरात मागे असणाऱ्या व्यक्तीला ज्याप्रमाणे सांगून निघतो, त्याचप्रमाणे आपल्या कुलदेवी, कुलदेवता यांचे टाक आपल्या देवघरात असतात, त्यांनाही आपण निघतोय असं सांगून निघावं आणि घरी आल्यावर हात पाय धुवून, देवासमोर दिवा लावून सुखरूप घरी आलो हे सांगावं, असं ज्योतिष अभ्यासक डॉ. शिरीष कुलकर्णी सांगतात.
घरातली परिस्थिती आपल्या नियंत्रणात असते, मात्र बाहेरच्या जगात कधी कोणते अनुभव येतील ते सांगता येत नाही. अशा वेळी आपला प्रवास सुखरूप व्हावा आणि दिवस चांगला जावा, सगळी कामे सुरळीत पार पडावीत म्हणून आपल्या कुलदेवतेचा निरोप घेऊन निघावे. डॉ. शिरीष कुलकर्णी म्हणतात, 'रोजच्या दिनचर्येत ही सवय लावून घेतलीत तर त्याचे परिणाम दीर्घकाळ अनुभवता येतील.
ज्योतिष शास्त्राबरोबरच मानस शास्त्राच्या दृष्टीने विचार करता ही सवय देवाशी आपले नाते दृढ करेल. रोजचा संवाद नात्यांना ओलावा देतो, तसा हा संवादही भक्त-भगवंताचे नाते दृढ करण्यास उपयुक्त ठरेल. फक्त आपल्या कामाच्या वेळी देवाशी संवाद न साधता रोज साधलेला संवाद दीर्घकाळ सकारात्मक परिणाम देईल आणि देव आपल्या पाठीशी आहे, हा आत्मविश्वासही देईल. त्यामुळे तुम्हीदेखील ही सवय लावून घ्या आणि फरक अनुभवा.
{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/9857688550964717/}}}}