>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
काही दिवसांपूर्वी एका स्त्रीने द्वितीय विवाह बद्दल प्रश्न विचारला होता. मात्र द्वितीय विवाहाने सुद्धा कोर्टाच्या पायऱ्या चढल्या होत्या, त्यामुळे तिच्या मनस्थितीचा अंदाज मी बांधला. त्या स्त्री जातकाने दोन पत्रिका आणल्या होत्या, ज्या तिला विवाह संस्थेतून मिळालेल्या होत्या. त्या दोन्ही पत्रिकांमध्ये तशीच स्थिती होती म्हणजे दोघांचेही घटस्फोट तेही दोन वेळा. थोडक्यात त्या सर्वच पत्रिकां तृतीय विवाहाच्या होत्या.
स्त्री ची पत्रिका बघितल्यावर मी तिला स्पष्ट सांगितले की तुमचीच पत्रिका वैवाहिक सुख दाखवत नाही, त्यामुळे अजून एखादा विवाह करून तुम्हाला आनंद मिळेल ह्याची खात्री नाही, उलट संकटे वाढतील तेव्हा पुनर्विवाहाचा विचार टाळावा. अर्थात त्यांचेही वय ५० कडे झुकणारे होते, अपत्य नव्हते. मी त्यांना म्हटले विवाह करायचा आहे सर्व ठीक, पण त्याही दोघांच्या पत्रिकेत वैवाहिक सुख नाही. त्यांचेही दोन विवाह मोडले आहेत, त्याची खरी कारणे तुम्हाला माहित आहेत का? नाही. त्यामुळे पुन्हा एकदा विवाह करण्याचा निर्णय तुम्हाला आणखी दुःखाच्या दरीत लोटू शकतो.
एखादी मोठी महादशा असेल आणि ती वैवाहिक सुख देत नसेल तर त्यात पहिलाच नाही तर दुसरा तिसरा विवाह सुद्धा मोडण्याची शक्यता असते. बुध एक घटना पुन्हा दर्शवतो त्यामुळे दुसरा विवाह होतो आणि पहिला मोडला तसा दुसरा सुद्धा मोडतो. कारण दशेच्या स्वामीचीच संमती नसेल, तर विवाह टिकत नाही. अनेकदा प्रथम विवाह मोडतो आणि दशा बदलते ती विवाहाला पूरक असते म्हणून द्वितीय विवाह होतो अर्थात त्यात वैवाहिक सुख मिळेलच ह्याची शाश्वती नसते पण विवाह होतो. विवाह हा नुसता वंशवेल वाढवण्यासाठीच होतो असे नाही, तर अनेक घरगुती समस्या, आर्थिक मानसिक विवंचना असतात त्यासाठी केला जातो. आपल्या जोडीदाराची साथ आवश्यक वाटते आणि ५० च्या आसपास तर असे वाटले तर त्यात चूक काहीही नाही. पण जीवाचा आटापिटा केला म्हणजे विवाह होत नाही, तो नशिबात असायला लागतो .
स्त्री जातकाला ह्या दोन्ही पत्रिका कशा अनुकूल नाहीत हे सांगितल्यावर त्यांचा स्वर जरा उदास झाल्याचे मला जाणवले, पण आहे ते स्वीकारायला पाहिजे हे त्यांना समजावून सांगितले. काही वेळाने त्यांनीच मला पुन्हा फोन करून मग आहे तोच दुसरा विवाह टिकवावा का? तो प्रयत्न केला तर टिकेल का? हा प्रश्न विचारल्यावर माझे मन खरच हेलावले. काहीही करून एकटे राहायचे नव्हते तशी मनाची तयारी नाही हे जाणवले आणि कशी असेल ? एकटेपणा तिला सहन होत नव्हता आणि तो दूर करण्यासाठीच पुन्हा विवाह हा पर्याय तिच्या मनाने स्वीकारला होता. पत्रिकेतील मनाचा कारक चंद्र सैरभैर झाला होता, एकटा पडला होता आणि म्हणून कुणाची तरी साथ सोबत शोधत होता, पण महादशा स्वामी सुखाची कुठलीच नांदी करताना दिसत नव्हता. दशेचा स्वामी विवाहासाठी असणाऱ्या नकारात्मक स्थानाचा अधिपती, शुक्र बिघडलेला ही स्थिती पुढे खूप वर्ष राहणार होती, जोवर दशा संपत नाही. दुर्दैवाने त्यांची पुढील दशा सुद्धा जवळपास अशीच म्हणजे विवाहाला अनुकूल नसणारी होती. कितीही वाईट असले तरी हे सत्य आहे आणि ते स्वीकारून पुढे जाण्यातच शहाणपण आहे, हेच त्यांनाही सांगितले. एकटेपणा कुणी स्वतःहून स्वीकारत नाही ती परिस्थिती अनेक कारणांमुळे आयुष्यात निर्माण होते.
आज समाजात अनेकविध प्रश्न आहेत, पण त्यातील सगळ्यात मोठा प्रश्न जो भेडसावत आहे, अनेक आजार जन्माला घालतो तो म्हणजे 'एकटेपणा!' कुणाची तरी साथ हवी , एकटे राहणे सोपे नाही, म्हणून विवाह करायची इच्छा मनात येते. आर्थिक नियोजन नसते किंवा ती बाजू सुद्धा डळमळीत असते अशाअनेक गोष्टी आहेत. घरात एकट्याने राहून आपला एकट्याचाच चहा करा, जेवण करा तेही एकट्यानेच जेवा , घरात कुणी बोलायला नाही सगळे निर्णय स्वतःच घ्या , दुखले खुपले तर कुणी बघायला सुद्धा नाही, संवाद नाही , सहवास नाही ह्या अनेक गोष्टी नुसत्या विचार करून सुद्धा त्रास देतात . ज्याचे जळते त्याला कळते म्हणतात ते खरे आहेच . वैवाहिक आयुष्याला पूर्णविराम म्हणजे अनेक वैचारिक आर्थिक, मानसिक, शारीरिक सर्व सुखांना जणू खिळ बसते. सगळ्या कटू आठवणी पाठ सोडत नाहीत आणि पुढे वाट दिसत नाही. तिचा विवाह करण्या मागील हेतू हा 'एकटेपणा दूर व्हावा' हाच प्रामुख्याने होता, कारण सुदैवाने आर्थिक सुबत्ता होती. पण म्हणून कुणाच्या ही गळ्यात माळ घालून नवीन प्रश्न आणि संकटांची मालिका सुरु करावी असाही त्याचा अर्थ नाही. थोडा वेगळा विचार करायला हवा. एकतर्फी विचार करून चालणार नाही. झालेल्या गोष्टींची पुनरावृत्ती झाली तर? मुळात विवाह हीच आज समाजातील ज्वलंत समस्या आहे त्यात दुसरा विवाह करणे हे डोळस पणे करायला हवे हेच सुचवायचे आहे . अनेकदा आपल्या नशिबात वैवाहिक सौख्य नसते तेव्हा आपल्याला सांगून येणाऱ्या पत्रिका सुद्धा तशाच असतात. कारण त्यांच्याही पत्रिकेत वैवाहिक सुखाचा योग नसतो. शेवटी सगळ्यांना सगळे देवाने दिलेले नाही. जे आहे त्यात आनंद मानायला शिकले पाहिजे. आहे हे सर्व असे आहे, महाकठीण आहे, मान्य आहे पण जे आहे ते स्वीकारण्याशिवाय पर्याय सुद्धा नाही. जितके लवकर ते स्वीकारू तितक्या लवकर आपण 'एकटे' जगायला शिकू.
आपण मुळात कुटुंब संस्था मानतो. एखाद्या कुटुंबात अनेक विध माणसांच्या गोतावळ्यात जन्म घेतो आणि आयुष्यभर ती नाती गोती जपत राहतो, त्यामुळे अचानक मनाच्या समीप असलेली व्यक्ती सोडून गेली की येणारा त्या नात्यातील एकटेपणा सहजासहजी स्वीकारता येणे कठीण जाते. एखाद्या व्यक्तीची सवय होते. त्यामुळे खूप काहीतरी गमावल्याची भीती सुद्धा मनाच्या कोपऱ्यात दडून असते. एकटे कशी किंवा कसा जगणार हा पहिला प्रश्न आपण नकारात्मक म्हणूनच स्वीकारतो आणि त्याच्या अन्य पैलूंकडे बघायला आपले मन तयार नसते.
निदान पन्नाशीच्या उम्बरठ्यावर उभे राहिल्यावर, एकटेपणा घालवण्यासाठी लग्न हा एकमेव पर्याय आहे हे आधी मनातून काढून टाकले पाहिजे. आपले आवडते छंद, अनेक सामाजिक संस्था ह्यात सहभाग घेतला तर आपला वेळ छान जाईल. मन कशात तरी गुंतून राहील. एकट्या राहणाऱ्या लोकांचे प्रश्न खरोखर गंभीर आहेत आणि त्यासाठी त्यांचे नातेवाईक, शेजारी आणि आप्तेष्ट ह्यांनी सुद्धा त्यांना सामावून घेतले पाहिजे. तसेच आपल्याला इतर लोक सामावून घेतील असे वागणे आणि वृत्ती ह्या लोकांनी ठेवली पाहिजे . आपण तुसडेपणाने वागलो तर अजूनच एकटे पडण्याची भीती आहे.
अनेकांचे अनेक प्रश्न असतात आणि प्रत्येकाने त्यातून मार्ग काढून आयुष्य जगायचे असते. पर्याय अनेक असतात, पण ते शोधावे लागतात .शेवटी आपणही एकटेच आलो आहोत आणि एकटेच जाणार आहोत. सारखं मी एकटा आहे, मी एकटी आहे, हे हे डोक्यातून काढून टाकले पाहिजे. कारण आपणच ते सतत मनावर बिंबवत असतो . तसे पाहिले तर आपण सगळे एकटेच आहोत . सगळ्यांची तिकिटे काढलेली आहेत, वेळ आली की जो तो जाणार, त्यामुळे कुणाच्याही आयुष्याशी तुलना न करता जे आहे ते स्वीकारणे आरोग्यदायी सुद्धा ठरेल. सारखे एकटे आहे, एकटे आहे, हे गोंजारत बसण्यापेक्षा वस्तुस्थिती स्वीकारली तर आयुष्य सुकर होईल. आयुष्य अर्ध्यावर म्हणजे साधारण ५० च्या आसपास असताना जोडीदार नसणे हे कठीण आहे. संसार अर्ध्यावर आलेला असतो आपल्या एकटेपणाची जाणीव आपण सोडून कुणालाही नसते . मुलं त्यांच्या विश्वात असतात आणि ते स्वाभाविक आहे. आपली मुले हा जोडीदारासाठी पर्याय असूच शकत नाही कारण ते नाते फक्त त्या दोघांचे असते. आर्थिक बाजू सांभाळावी लागते आणि ही सर्व कसरत करताना जीव मेटाकुटीला येतो. म्हणून द्वितीय विवाह कदाचित ह्या सर्व बाबी सांभाळेल हा विचार करणे चुकीचे नाही पण तरीही तो झाला नाही किंवा आपल्या नशिबात तो नसेल तर ती ईश्वरी इच्छा समजून त्याच विचारात राहणे योग्य नाही.
तिच्या प्रश्नासोबत तिचे उत्तर होते. अजून एक विवाह हे तिच्या सर्व प्रश्नांचे उत्तर होते जे तिच्या दृष्टीने योग्य होते. त्यापुढे तिचे विचार प्राप्त स्थितीत जातच नव्हते. तरीही ते नवीन विवंचना देणारे होते हे नक्की. अनेक प्रश्नांना 'काळ आणि वेळ' हेच उत्तर असते. अशी कुठलीही परिस्थिती नाही ज्यातून देव आपल्याला मार्गस्थ करत नाही. आज अनेक पत्रिका येतात ज्यांचे विवाहच झालेले नाहीत. आई वडिलांना चिंता असते, आपल्यामागे आपल्या अपत्याचे कसे होणार? आणि हा विचार चुकीचा नाही त्यांना काळजी असणे स्वाभाविक आहे. पण जे आहे ते आहे. शेवटी जगी सर्व सुखी असा कोण आहे ? हेच सत्य आहे.
संपर्क : 8104639230