अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 12:52 IST2025-10-02T12:51:29+5:302025-10-02T12:52:12+5:30
Ashwin Pashankusha Ekadashi 2025: दसरा विजयादशमीनंतर येणाऱ्या पाशांकुशा एकादशीचे महत्त्व अनन्य साधारण असल्याचे म्हटले जाते. व्रतकथा जाणून घ्या...

अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
Ashwin Pashankusha Ekadashi 2025:चातुर्मासातील अश्विन महिन्यात विजयादशमी दसरा साजरा झाल्यानंतर पाशांकुशा एकादशी व्रत केले जाते. संपूर्ण वर्षभरात २४ एकादशी साजऱ्या केल्या जातात. चातुर्मासात येणाऱ्या अश्विन महिन्यातील नवरात्रोत्सवानंतर येणाऱ्या एकादशीला पाशांकुशा एकादशी म्हटले जाते. पाशांकुशा एकादशीला श्रीविष्णुंच्या पद्मनाथ स्वरुपाचे पूजन करण्याची परंपरा प्रचलित आहे, असे म्हटले जाते. पाशांकुशा एकादशीचे व्रत कसे आचरावे, व्रत पूजनाची सोपी पद्धत जाणून घेऊया...
वर्षभरातील सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत सर्वोच्च, सर्वोत्तम, सर्वश्रेष्ठ मानले गेले आहे. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. कुंडलीतील चंद्र कमकुवत असल्यास पाशांकुशा एकादशीचे व्रत आवर्जुन करावे, असे सांगितले जाते. महाभारत काळात श्रीकृष्णाने या एकादशीचे महत्त्व युधिष्ठिराला सांगितले होते. पाशांकुशा एकादशीमुळे सर्व पापांचा नाश होतो. पापातून मुक्तता मिळते. या एकादशीला दानधर्म आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व असून, याच्या प्रभावामुळे सूर्य यज्ञाचे फलप्राप्त होते, असे सांगितले जाते.
पाशांकुशा व्रताचरणात मौन बाळगून आराधना करावी
पुराणातील काही कथा अन् मान्यतांनुसार, पापरुपी हत्तीवर पुण्य रुपी अंकुशाने नियंत्रण ठेवण्यासाठी या एकादशीला पाशांकुशा एकादशी असे म्हटले जाते. एखाद्या माणसाकडून अनावधानाने जरी पाप घडले, तरी पाशांकुशा एकादशीचे व्रत करावे. असे केल्याने पापांचा नाश होऊन सद्गुणांचा समावेश व्रतकर्त्या व्यक्तीत होतो, असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितल्याचे म्हटले जाते. पाशांकुशा व्रताचरणात मौन बाळगून आराधना करावी, असे सांगितले जाते.
पाशांकुशा एकादशी व्रत पूजन विधी
यंदा शुक्रवार, ०३ ऑक्टोबर २०२५ रोजी पाशांकुशा एकादशी आहे. वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. अश्विन महिन्यातील शुद्ध पक्षात येणाऱ्या पाशांकुशा एकादशी दिनी केलेल्या व्रतपूजनाचे विशेष पुण्य प्राप्त होऊन सर्व पापांतून मुक्ती मिळू शकते, अशी मान्यता आहे. एकादशी व्रताचरण आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. षोडषोपचार पूजा शक्य नसेल, तर पंचोपचार पूजा करावी. आपापले कुळाचार, कुळधर्म, परंपरा पाळून एकादशी व्रताचरण करावे, असे सांगितले जाते.
पाशांकुशा एकादशी व्रतकथा
पाशांकुशा एकादशीची व्रतकथा पुराणात आढळून येते. प्राचीन काळात क्रोधन नामक एक क्रूर पारधी विंध्य पर्वतावर राहत असे. त्यांनी आपले संपूर्ण जीवन हिंसा, मद्यपान, लोकांना लुटणे, फसवणे, कपट करणे यांसारखी वाईट, चुकीची कामे करण्यात व्यतीत केले. कालांतराने त्याचा मृत्यूजवळ आल्यावर यमराजांनी दोन दूतांना पाठवून, उद्या तुझा मृत्यू होणार आहे, असे त्याला सांगितले. मृत्यूचे नाव ऐकताच तो प्रचंड भयभीत झाला. महर्षी अंगिरा यांना शरण जात यावर उपाय विचारला. तेव्हा महर्षी अंगिरा यांनी क्रोधनला पाशांकुशा एकादशीचे व्रत करण्यास सांगितले. क्रोधनने मनोभावे हे व्रत केले. या व्रतामुळे त्याच्या सर्व पापांचा नाश झाला आणि त्याला मोक्ष प्राप्ती झाली, अशी व्रतकथा असल्याचे सांगितले जाते.
पाशांकुशा एकादशी व्रत सांगता विधी
या एकादशीला जागरण करून भजन, कीर्तनात रात्र जागवावी, असे सांगितले जाते. एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी.
॥ ॐ नमो भगवते वासुदेवाय ॥