Anant Chaturdashi 2025: अवघ्या काही दिवसांनी गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी हा कालावधी महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एक पर्वणी काळ असतो. गणपती बाप्पाचे अगदी उत्साहात स्वागत केल्यानंतर यथाशक्ती, यथोचित सेवा केली जाते. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, गौरींसह गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला जातो. अनंत चतुर्दशीला घरगुती, मंडळातील गणपतींचे विसर्जन केले जाते. यंदाची अनंत चतुर्दशी कधी आहे? गणोशोत्सवाची सांगता कधी होणार? जाणून घेऊया...
दीड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा किंवा अगदी दहा दिवसाचा गणपती असला, तरी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना खूप वाईट वाटते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशी आर्त विनवणी केली जाते. यंदा, शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी आहे. शुक्रवार, ०५ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ०३ वाजून १२ मिनिटांनी भाद्रपद शुद्ध चतुर्दशीची सुरुवात होत आहे. तर, शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ०१ वाजून ४१ मिनिटांनी अनंत चतुर्दशी समाप्त होईल.
भाद्रपद पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण
रविवार, ०७ सप्टेंबर २०२५ रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे. भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण शनिचे स्वामित्व असलेल्या कुंभ राशीत लागणार आहे. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपासून चंद्रग्रहणाचे वेध लागणार आहेत. २०२५ मधील भाद्रपद पौर्णिमेला लागणारे चंद्रग्रहण संपूर्ण भारतात दिसणार आहे. ०७ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ०९ वाजून ५७ मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा स्पर्श असून, मध्यरात्री ०१ वाजून २७ मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहणाचा मोक्ष आहे. खग्रास चंद्रग्रहणाचा पर्वकाळ ०३.३० तास आहे. चंद्रग्रहणापूर्वी गणपती बाप्पाचे विसर्जन करावे, असे म्हटले जात आहे. भारतातून ग्रहण दिसणार असल्यामुळे ग्रहणाचे नियम पाळले जाणार आहेत.
२०२६ मध्ये गणपती बाप्पाचे आगमन कधी?
पुढच्या वर्षी बाप्पांचे आगमन १८ दिवस उशिराने होणार आहे. कारण पुढील वर्षी ज्येष्ठ अधिकमास आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी गणेश चतुर्थी ही १४ सप्टेंबर २०२६ रोजी असेल.