अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 12:46 IST2025-10-08T12:42:34+5:302025-10-08T12:46:11+5:30
Shree Swami Samarth Maharaj: अक्कलकोटला घडलेल्या एका प्रसंगात स्वामी दत्तात्रेयांचे द्वितीय अवतार म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांच्या स्वरुपात दर्शन देतात.

अक्कलकोट हेच गाणगापूर! स्वामी देतात नृसिंह सरस्वती स्वरुपात दर्शन, पुजारी होतात नतमस्तक
Shree Swami Samarth Maharaj: अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे आज लक्षावधी आर्त, जिज्ञासूंचे आश्रयस्थान आहे. श्री स्वामी समर्थांचा अवतार ही भगवंताची सर्वांत मोठी लीला मानली गेली आहे. स्वामी समर्थांना समाधिस्थ होऊन शंभर वर्षांहून अधिक वर्षे उलटून गेला असला तरी त्यांचा महिमा दिवसेंदिवस वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या सगुण ब्रह्माची उपासना अतीव श्रद्धेने, प्रेमाने अन् भक्तीने महाराष्ट्रातील घराघरांतून नित्य सुरू आहे. स्वामींच्या अस्तित्वाचे अन् कृपेचे अनंत चमत्कार हजारो भक्त नित्य अनुभवत आहेत. स्वामी समर्थ महाराज हे दत्तप्रभूंचे तिसरे अवतार मानले गेले आहेत. तर नृसिंह सरस्वती हे दुसरे अवतार मानले गेले आहेत. एका प्रसंगात स्वामींनी तेच नृसिंह सरस्वती असल्याचे भक्ताला दाखवून देत त्यांच्याच स्वरुपात दर्शन दिल्याचे म्हटले जाते.
श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतील. प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार? श्री स्वामी समर्थांचे माहात्म्य आणि त्यांचे चरित्र अनेकांनी अनेक प्रकारे रंगविले असले तरी त्याचा जो अधिक विचार करावा, तो त्याचे अनंत नवे पैलू आपल्या लक्षात येतात. खरोखरच अद्भूताचा अनुभव येतो. सूर्य किरण जसे मोजता येत नाही, सागराच्या लाटांची मोजदाद करता येत नाही, त्याचप्रमाणे स्वामींच्या चरित्राचा थांगच लागत नाही, असे अनेक जण सांगतात. असेच एकदा बसलेले असताना स्वामी भक्तांना विचारतात की, आम्ही कोण आहे? यावर चोळप्पा उत्तर देतात की, आपण त्रिभुवन नायक आहात! परंतु, चोळप्पा यांच्या उत्तराने स्वामी संतुष्ट होत नाही आणि म्हणतात की, आज बाळप्पा असता तर त्यांनी अचूक उत्तर दिले असते.
गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पाहायला आला
स्वामींचा यशवंत नावाचा एक शिष्य मंगळवेढ्याला मामलेदार होता. त्या वेळेला मंगळवेढ्याला दुष्काळ पडला होता. लोक अन्न-पाण्याला पारखे झाले होते. लोकांचे हाल पाहून यशवंताच्या घशातून अन्न उतरत नव्हते. इकडे गाणगापूर मंदिराचा पुजारी स्वामींची परीक्षा पहायला आला होता. स्वामी स्वत:ला दत्त अवतार असल्याची हवा पसरून लोकांना भ्रमित करतात, असे त्याचे मत होते. अक्कलकोटात येताच तडकाफडकी तो पुजारी वटवृक्षाखाली बसलेल्या स्वामींकडे येतो. त्याला पाहिल्याबरोबर स्वामी म्हणतात की, काय रे! गाणगापूर मंदिराचा पुजारी ना तू! आम्ही कोण ही परीक्षा घ्यायला आला ना?
आम्ही नरसिंहभान आहोत...!!!
पुजारी चपापतो. पण स्पष्टपणे कबुली देतो. मग स्वामी विचारतात की, गाणगापूरला कोणाची भक्ती करतो? पुजारी उत्तर देतो की, श्रीनरसिंहसरस्वतीची! त्यावर स्वामी म्हणतात की, आम्ही नरसिंहभान आहोत! नीट बघ आम्हाला! पुजारी पाहतो, तर काय स्वामींच्या जागेवर साक्षात नरसिंहसरस्वती उभे आहे. पुजाऱ्याला गहिवरून येते. काही क्षणांनी स्वामींच्या जागी श्रीपाद श्रीवल्लभ दिसतात. पुजाऱ्याला पूर्ण प्रचीती येते की, स्वामी साक्षात दत्त अवतार आहे. तो स्वामी-चरणी मस्तक ठेवतो आणि क्षमा मागतो.
अक्कलकोट हेच गाणगापूर आणि गाणगापूर हेच अक्कलकोट
मग म्हणतो की, अक्कलकोट हेच गाणगापूर आणि गाणगापूर हेच अक्कलकोट आहे! इकडे मामलेदार यशवंत, सरकारी धान्य गोदामातील धान्य गरजवंत लोकांमध्ये वाटून टाकतो. सरकारी धान्य वाटल्यामुळे त्याला १०,००० रुपये दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यंत सरकारी खजिन्यात जमा करा, असा आदेश येतो. यशवंत घर-दार, शेत व बायकोचे दागिने विकायला काढतो पण त्या सर्वांचे मात्र १००० रुपये मिळणार, असे सावकार सांगतो. सावकार शिल्लक ९,००० रुपयाचे कर्ज द्यायला स्पष्ट नकार देतो. पैसे न भरल्या मुले वरिष्ठ अधिकारी यशवंताला अटक करायला येतात. त्याला बेड्या पडणारच होत्या तेव्हा स्वामी एका शेटजीच्या रुपात येतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांना १०,००० रुपये देऊन यशवंतची सुटका करतात. अधिकारी लोक गेल्यावर स्वामी यशवंताला आपल्या खरे स्वरूपात दर्शन देतात.
॥ श्री स्वामी समर्थ ॥