बीडमध्ये तलवारीने केक कापून घरी निघालेला तरुण अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:57 IST2019-02-06T17:56:56+5:302019-02-06T17:57:52+5:30

तलवारीने केक कापल्याचे कृष्णा सांगत आहे. मात्र कोणाचा वाढदिवस होता, याबाबत तो बोलत नाही.

A young man arrested in cake cut by a sword case in Beed | बीडमध्ये तलवारीने केक कापून घरी निघालेला तरुण अटकेत

बीडमध्ये तलवारीने केक कापून घरी निघालेला तरुण अटकेत

बीड : तलवारीने वाढदिवसाचा केक कापून घरी निघालेल्या एकास गजाआड करण्यात आले आहे. त्याच्याकडून तलवार जप्त केली असून पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी रात्री केली.

कृष्णा धर्मराज रणदिवे (२६,  रा.बलभीम नगर, पेठ बीड) असे पकडलेल्या तरूणाचे नाव आहे. मंगळवारी रात्री पेठबीड पोलीस ठाणे हद्दीत तलवारीने केक कापला जात असल्याची माहिती एलसीबीचे सपोनि अमोल धस यांना मिळाली. त्यांनी तात्काळ पेठबीडमध्ये धाव घेतली. मात्र तोपर्यंत कार्यक्रम संपला होता. मात्र कृष्णा हा तलवार घेऊन जाताना त्यांना दिसला. तपासणी केली असता तलवारीला केक लागल्याचे आढळून आले. त्यानंतर धस यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेऊन त्याच्याकडील तलवार जप्त केली. तोतला गिरणीजवळून तो पलायन करण्याच्या आतच त्याला बेड्या ठोकल्या. त्याच्याविरोधात आर्म अ‍ॅक्टप्रमाणे पेठबीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

नसीर शेख यांनी याबाबत फिर्याद दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, पोनि घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली  सपोनि अमोल धस, साजीद पठाण, नसीर शेख, सखाराम पवार, राजू वंजारे आदींनी केली. 

वाढदिवस कोणाचा? शोध सुरू
तलवारीने केक कापल्याचे कृष्णा सांगत आहे. मात्र कोणाचा वाढदिवस होता, याबाबत तो बोलत नाही. त्याची चौकशी सुरू असून वाढदिवस कोणाचा होता, आणि केक कापताना कोण कोण उपस्थित होते, याची माहिती एलसीबी व पेठबीड पोलीस घेत असल्याचे सूत्रांकडून समजते.

Web Title: A young man arrested in cake cut by a sword case in Beed