ये रे घना ये रे घना, सोयाबीनने टाकल्या माना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST2021-08-13T04:38:06+5:302021-08-13T04:38:06+5:30
: उजनी मंडळातील पिकांची अवस्था बिकट संजय कातकडे उजनी : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, पावसाने पाठ ...

ये रे घना ये रे घना, सोयाबीनने टाकल्या माना
: उजनी मंडळातील पिकांची अवस्था बिकट
संजय कातकडे
उजनी : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, पावसाने पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे.
मागील काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा सुरू असून, कोसा-कोसावर पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे. कुठं अचानक ढगफुटी होऊन जमिनी वाहून जाणारा पाऊस पडतो तर तिथूनच काही अंतरावर पाण्याअभावी पिके वाळून जातात निसर्गाच्या अशा लहरीपणामुळे शेतकऱ्यांना संकटांना तोंड द्यावे लागत आहे.
अंबाजोगाई तालुक्यातील उजनी महसूल मंडळातील गावांमध्ये यावर्षी पेरणीच्या सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. परंतु पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरून आभाळाकडे डोळे लावले होते. कमी अधिक प्रमाणात पडत असलेल्या पावसाने शिवारातील पिके बहरली होती. मात्र पावसाने तब्बल वीस दिवसांपासून पाठ फिरवली आहे.
खरीप हंगामातील मूग, उडीद या कमी कालावधीच्या पिकांची शेंगा भरण्याची अवस्था या महत्त्वाच्या वेळी पाऊस उघडल्याने ही पिकं शेंगा पक्व होण्याआधीच वाळून जात आहेत. तर परिसरात सर्वाधिक पेरा असलेल्या सोयाबीनची सध्याची अवस्थादेखील फुलोरा व शेंगा लागण्याची आहे. सोयाबीनच्या फुलोऱ्याच्या टप्प्यात पावसाने मोठी उघडीप दिल्याने पिकाचे अतोनात नुकसान होणार आहे. मागील आठवड्यापासून या भागात उन्हाळ्याप्रमाणे कडक ऊन पडत आहे व तापमानामध्येदेखील वाढ झाली आहे. त्यामुळे हलक्या जमिनीतील, माळरानावरील पिकांनी तर आता माना टाकून द्यायला सुरुवात झाली आहे.
महागडी खते, बी-बियाणे व औषधी वापरून जगविलेली पिके कोमेजून जात असलेली पाहून शेतकरी हतबल होत आहेत. सिंचनाची सोय असलेल्या शेतकऱ्यांचा पिकांना पाणी देऊन पीक वाचवण्यासाठी आटापिटा सुरू आहे. मात्र विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकरी हवालदिल होत आहेत.
उजनी परिसरात सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळॆ परिसरातील नदी, नाले अजून कोरडेठाक आहेत. पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनसह अन्य पिकं कोमेजून जात आहेत.
- व्यंकटराव फड, शेतकरी, धसवाडी.
वीस दिवसांपासून पाऊस उघडल्याने सोयाबीन वाळत आहे. पाण्याची सोय असलेले शेतकरी सोयाबीन भिजविण्यासाठी रात्रंदिवस बेजार होत आहेत. मात्र विजेच्या लपंडावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच येत आहे.
-विशाल मुंडे, शेतकरी, कुसळवाडी