महिला, मुली घरातच असुरक्षित; ओळखीचे, जवळच्या नातेवाइकांपासूनच अधिक धोका
By सोमनाथ खताळ | Updated: February 27, 2025 11:57 IST2025-02-27T11:54:59+5:302025-02-27T11:57:53+5:30
नात्यातील लोकच अत्याचार, छेडछाड करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे असे असले, तरी सर्वच सारखे असतात, असे नाही.

महिला, मुली घरातच असुरक्षित; ओळखीचे, जवळच्या नातेवाइकांपासूनच अधिक धोका
बीड : जिल्ह्यात महिला अन्याय, अत्याचारांच्या घटना थांबत नसल्याचे समोर आले आहे. २०२४ या वर्षात १७७ महिलांवर अत्याचार झाला आहे. तसेच, अल्पवयीन मुलीही या अत्याचाराच्या शिकार झाल्या आहेत. असे ४४५ गुन्हे पोलिस दप्तरी नोंद आहेत. विशेष म्हणजे अनोळखी लोकांपेक्षा ओळखीच्या लोकांच्याच महिला, मुली शिकार झाल्या आहेत. या सर्व प्रकरणांवरून महिला, मुली घरातच असुरक्षित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आईसह घरातील ज्येष्ठांनी वारंवार लक्ष ठेवण्यासह संवाद साधण्याची गरज आहे. मी तुमचीच, तरीही माझ्यावर वाईट नजर का? असा सवाल आता महिलांमधून उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे. खुनांसह जीवघेणे हल्ले, अपहरण आदी गंभीर गुन्ह्यांचा आलेख वाढत आहे. त्यातच मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणाने बीडचे नाव राज्यभर झाले. याच अनुषंगाने जिल्ह्यातील मुली, महिलांवरील अन्याय, अत्याचाराची आकडेवारी घेतली असता धक्कादायक माहिती समोर आली. अत्याचार, विनयभंग करणारे लोक हे बाहेरचे कमी आणि घरातले, नातेवाईक, ओळखीतलेच जास्त असल्याचे समोर आले. त्यामुळे विश्वास ठेवायचा कोणावर? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
दोन दिवसांना अत्याचार
महिला, मुलींवर जिल्ह्यात दर दोन दिवसांना अत्याचाराची घटना घडत आहे, तसेच दररोज एका महिला, मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात महिला, मुली असुरक्षित असल्याचे दिसून येते.
या घटना नात्याला काळिमा
धारूर पोलिस ठाणे हद्दीत जवळच्या नातेवाईकानेच मुलीवर अत्याचार केला होता. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण समोर आले होते. त्यानंतर पाटोदा पोलिस ठाणे हद्दीतही जवळच्यानेच मुलीवर अत्याचार केला हाेता. अशाच नात्यातील इतर लोकांनीही महिला, अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
बहुतांश घटना या आमिष दाखवून झालेल्या आहेत. यात महिला, मुलींना लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला जातो. तसेच, चॉकलेटसह इतर आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला जातो.
गुड टच, बॅड टचची माहिती मुलींना द्यावी
नात्यातील लोकच अत्याचार, छेडछाड करत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे असे असले, तरी सर्वच सारखे असतात, असे नाही. अशा काळिमा फासणाऱ्या घटना टाळण्यासाठी घरातील ज्येष्ठांनी महिला, मुलींशी संवाद साधणे आवश्यक आहे. तसेच, त्यांच्यावर लक्ष ठेवणेही तितकेच गरजेचे आहे. येथे संस्काराचा भागही महत्त्वाचा ठरतो. आपले थोडेसे दुर्लक्ष मुलगी अथवा महिलेचे आयुष्य खराब करते. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी. गुड टच, बॅड टचची माहिती मुलींना द्यावी.
- तत्वशील कांबळे, बालहक्क कार्यकर्ते, बीड
पालकांनी विशेष लक्ष द्यावे
महिला, मुलींना त्रास होत असल्यास तातडीने पोलिसांची मदत घ्यावी. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. लहान मुलींसोबत नेहमी संवाद ठेवावा. ठराविक वयात आल्यानंतर मुलींकडे लक्ष देण्याची गरज आहे. काही लोक त्यांच्या अल्पवयीन असल्याचा गैरफायदा घेऊन अत्याचार अथवा छेडछाड करतात. बालविवाह लावणे हा देखील गुन्हा आहे. पालकांनी विशेष लक्ष द्यावे. काही तक्रार असल्यास भेटावे.
- अशोक तांगडे, अध्यक्ष, महिला व बालकल्याण समिती बीड
११२ वर लगेच कॉल करा
महिला, मुलीची तक्रार आली की प्राधान्याने घेतली जाते. तपासात जे निष्पन्न होईल, त्याप्रमाणे दोषारोपपत्र दाखल केले जाते. जवळपास घटनांमध्ये ओळखीचेच आरोपी असतात. मानसिकता बदलल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. तसेच पहिल्यांदा एखाद्याने थोडा त्रास दिला तर त्यावर लगेच आवाज उठविणे आवश्यक आहे. महिला, मुलींसह सामान्य नागरिक डायल ११२ वरून कधीही मदत घेऊ शकता.
- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड
आकडे काय सांगतात?
२०२३
१८ वर्षांखालील विनयभंग - ९० अत्याचार - ८६
१८ वर्षांवरील विनयभंग - ३४०
अत्याचार - ७८
२०२४
१८ वर्षांखालील
विनयंभग - ९१ अत्याचार - ८८
१८ वर्षांवरील विनयभंग - ३५३ अत्याचार - ८९
२०२३
अत्याचार - १६४ विनयभंग - ४३०
२०२४
अत्याचार - १७७ विनयभंग - ४४५