राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना महिलांनी दिला चप्पलेने चोप; शर्ट काढून रस्ता करायला लावला साफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 17:36 IST2021-06-25T17:30:41+5:302021-06-25T17:36:35+5:30

आक्रमक झालेल्या महिला पाहून गाडीतून उतरून वाहनचालकांनी राखेचे ढीग उचलून रस्ता स्वच्छ केला तेव्हाच त्यांच्या गाड्या तेथून पुढे जाऊ शकल्या. 

Women beat drivers transporting ashes; He took off his shirt and cleared the road | राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना महिलांनी दिला चप्पलेने चोप; शर्ट काढून रस्ता करायला लावला साफ

राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना महिलांनी दिला चप्पलेने चोप; शर्ट काढून रस्ता करायला लावला साफ

ठळक मुद्देरस्त्यावर राखेचे ढीग साचल्याने परिसरात प्रदूषण वाढले आहेदररोज 200 हायवा गाड्यातून राखेची वाहतूक

- संजय खाकरे

परळी : हायवा टिप्पर गाड्यातील राख रस्त्यावर पडून प्रदूषण होत असल्याने शहरासह आजूबाजूच्या खेड्यातील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. शुक्रवारी सकाळी राखेच्या प्रदूषणामुळे संतप्त झालेल्या पांगरी कॅम्प येथील रणरागिणी महिलांनी राखेच्या गाड्या अडवून वाहनचालकांना चांगलाच चोप दिला. यानंतर वाहनचालकांना चक्क रस्ता साफ करायला लावला. आक्रमक झालेल्या महिला पाहून गाडीतून उतरून वाहनचालकांनी राखेचे ढीग उचलून रस्ता स्वच्छ केला तेव्हाच त्यांच्या गाड्या तेथून पुढे जाऊ शकल्या. 

शुक्रवारी सकाळी या प्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. परळी -बीड रस्त्यावर पांगरी हे गाव आहे या मार्गाने पंधरा मिनिटाला 25 हायवा राखेची वाहतूक केली जात आहे. तर 25 रिकाम्या हायवा गाड्या येत आहेत. यातील राख रस्त्यावर पडत आहे. राखेच्या वाहनांच्या वाहतुकीमुळे परळी-पांगरी रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना दुचाकी वाहन चालविणे अशक्य झाले आहे. यास कंटाळून शुक्रवारी सकाळी पांगरी रस्त्यावर या भागातील दोन महिला व इतर पाच पुरुष आले आणि त्यांनी राखेची वाहने अडवली .वाहन चालकाला गाडीतून खाली उतरविले व रस्त्यावर पडलेले राखेचे ढीग स्वच्छ करून घेतले अंगावरील शर्ट काढून शर्ट ने ही रस्ता स्वच्छ करायला लावला. 

दररोज 200 हायवा गाड्यातून राखेची वाहतूक
परळी तालुक्यातील वडगाव दादाहारी ,दाऊतपुर शिवारात औष्णिक विद्युत केंद्राचे राख तळे आहे. येथून दररोज 200 हायवा गाडी राख भरून विक्रीसाठी व्यवसायिक घेवून जातात. राखेची वाहतूक परळीच्या चार ही दिशेने होत असल्याने सर्वच भागातील नागरिक राख प्रदूषणाला कंटाळले आहेत. या प्रश्नी दादाहरी वडगाव च्या ग्रामस्थांनी दोन वेळा रस्ता रोको आंदोलन केले .ऊर्जामंत्री, मुख्य अभियंत्यांना निवेदन दिले ,चर्चा केली. काही दिवसापूर्वी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राख वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले. तरीही राखे वाहतूक बंद होण्याऐवजी जोरात सुरू आहे. 

राखेच्या प्रदूषणाने आरोग्य धोक्यात 
परळी शहरातूनही राखेची वाहतूक केली जात असल्याने प्रदूषण होऊन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बीड ,नगर ,लातूर परभणी जिल्ह्यात विट भट्टी साठी राख विक्री केली जात आहे. परळी -बीड मार्गावर असलेल्या तळेगाव, टोकवाडी ,पांगरी, लिंबोटा, रेवली वडखेल, सीरसाळा तसेच नागापूर, डाबी बहादूरवाडी व परळी- गंगाखेड रोडवरील दादाहारी वडगाव ,दाऊतपुर या ठिकाणचे ग्रामस्थ व शहरातील नागरिक रस्त्यावरून हायवा टिप्पर राख सांडत जात असल्याने त्रस्त झाले आहेत. रस्त्यावर पडलेली राख हवेने उडून नागरिकांच्या घरात ,दुकानात जात आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होत असून श्वसन व डोळ्याचे विकार जडत आहेत.

परळी -पांगरी रस्त्यावर होणारे राखेचे प्रदूषण रोखावे यासाठी स्थानिक प्रशासनाला निवेदन दिले, पण प्रशासनाने काही कारवाई केली नाही, नागरिकांना नाईलाजाने हातात कायदा घ्यावा लागत आहे. प्रशासनाने राख वाहतूक करणाऱ्यांना नियम करावे.
- नंदकिशोर मुंडे, सामाजिक कार्यकर्ते 

पांगरी येथे महिलांनी राख वाहतूक चालकांना चोप दिला याचा आदर्श परळी शहरातील लोकांनी व अन्य ठिकाणच्या लोकांनी घेऊन राख माफियांना धडा शिकवावा, प्रशासन काही कारवाई करत नसल्याने नागरिकांना अशी कारवाई करण्याची वेळ आली आहे.
- शिवाजी शिंदे, माजी सरपंच, दादाहारी वडगाव

Web Title: Women beat drivers transporting ashes; He took off his shirt and cleared the road