भाजपात वाढले इच्छुक; अनेक ठिकाणी पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:08 AM2019-09-22T00:08:53+5:302019-09-22T00:09:22+5:30

बीड जिल्ह्यात भाजपात इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे उमेदवारी जाहीर करताना निश्चितच पेच निर्माण होणार आहे.

Willing to rise in BJP; Screw in many places | भाजपात वाढले इच्छुक; अनेक ठिकाणी पेच

भाजपात वाढले इच्छुक; अनेक ठिकाणी पेच

Next

सतीश जोशी।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड जिल्ह्यात भाजपात इच्छुकांची संख्या वाढल्यामुळे उमेदवारी जाहीर करताना निश्चितच पेच निर्माण होणार आहे. विशेषत: आष्टीमध्ये आ.सुरेश धसांचे पूत्र जयदत्त धसांनी संपर्क वाढविल्यामुळे भाजपाच्या मतदारांत संभ्रम निर्माण झाला असून विद्यमान आमदार भीमराव धोंडे यांची डोकेदुखी वाढली आहे. इकडे माजलगावमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार आर.टी. देशमुख असतानाही रमेश आडसकरांनी संपर्क वाढविल्यामुळे उमेदवारीबाबत अनिश्चिततेचे वातावरण तयार झाले आहे.
बीड जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ असून २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने परळी, माजलगाव, आष्टी, गेवराई आणि केज तर राष्टÑवादी काँग्रेसने बीडची जागा जिंकली होती. बीडचे जयदत्त क्षीरसागर यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला. युती झाल्यास ही जागा शिवसेनेला सुटते की शिवसंग्रामला सुटते, याबद्दल उत्सुकता आहे. शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर प्रचारास लागले आहेत. शिवसंग्रामकडून आ.विनायक मेटे तर राष्टÑवादीकडून संदीप क्षीरसागर मैदानात उतरतील. वंचित आणि एमआयएमचा उमेदवार अजून निश्चित नाही.
गेवराईत भाजपाकडून आ. लक्ष्मण पवार, राष्टÑवादीकडून विजयसिंह पंडित यांची उमेदवारी निश्चित आहे. युती झाल्यास शिवसेनेच्या बदामराव पंडित यांची भूमिका काय असेल, हे ही उत्सुकतेचे आहे. वंचितकडून इंजि. विष्णू देवकते यांची शक्यता आहे.
माजलगावमध्ये विद्यमान आमदार आर. टी. देशमुख यांच्यासह रमेश आडसकर, मोहन जगताप, ओमप्रकाश शेट्ये हे इच्छूक आहेत. राष्टÑवादीने प्रकाश सोळंके यांची उमेदवारी आधीच जाहीर केली आहे. वंचित आणि एमआयएमचा उमेदवारही ठरला नाही.
जिल्ह्यातील सर्वात चुरस परळीत पहावयास मिळणार आहे. भाजपाच्या पंकजा मुंडे आणि राष्टÑवादीचे धनंजय मुंडे या बहीण-भावात ही लढत असेल. आतापासूृनच या मतदारसंघात वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
आष्टीमध्ये भाजपाचे विद्यमान आमदार भीमराव धोंडे असताना आ.सुरेश धस यांचे पूत्र जयदत्त धस हे मतदारसंघात फिरत आहेत. साहेबराव दरेकर हे देखील इच्छूक आहेत. राष्टवादी काँगे्रस, वंचित, एमआयएम यांचे उमेदवार अजून जाहीर झाले नाहीत.
केजमध्ये देखील संदीग्ध स्थिती आहे. नमिता मुंदडा यांना राष्टÑवादीतील गटबाजी भोवणार आहे. तसा उघड विरोधही केला आहे. तशीच अवस्था भाजपाच्या आमदार संगीता ठोंबरे यांची झाली आहे. शिवसेनेसह पक्षाच्या काही नेते मंडळीनी ठोंबरेंच्या उमेदवारीस विरोध दर्शवून पर्याय सूचविले आहेत.
बहीण-भाऊ आणि काका-पुतणे लढत
परळी विधानसभा मतदार संघात भाजपच्या पंकजा मुंडे आणि राष्टÑवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे या बहीणभावात लागोपाठ दुसऱ्यांदा लढत होईल. २०१४ मध्ये पंकजांनी धनंजय मुंडे यांचा जवळपास २५ हजार मतांनी पराभव केला होता. २००९ आणि २०१४ ची निवडणूक जिंकलेल्या पंकजांना हॅटट्रिक करण्याची तर धनंजय मुंडेंना झालेल्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी आहे. इकडे बीडमध्ये शिवसेनेचे जयदत्त क्षीरसागर आणि राष्टÑवादी काँग्रेसचे संदीप क्षीरसागर यांच्यात लढत होत आहे. २००९ आणि २०१४ ची निवडणूक जयदत्त यांनी राष्टÑवादीच्या तिकिटावर निवडणूक जिंकली आहे. आता ते शिवसेनेचे धणुष्यबाण घेऊन रिंगणात उतरतील. त्यांनाही हॅटट्रिकची संधी आहे. लढत मात्र पुतण्याशी होत आहे.
केजमध्ये गटबाजी..
केजमध्ये राष्टÑवादी काँग्रेसकडून नमिता मुंदडा यांची उमेदवारी शरद पवार यांनी जाहीर केली असली तरी मुंदडाच्या उमेदवारीस धनंजय मुंदडा, बजरंग सोनवणे यांचा विरोध असल्याची चर्चा आहे. इकडे भाजपाच्या विद्यमान आमदार संगीता ठोंबरे यांना देखील शिवसेनेसह भाजपांतर्गत एका गटाकडून तीव्र विरोध होत आहे.
माजलगावमध्ये पेच
माजलगावमध्ये विद्यमान आमदार भाजपाचे आर.टी. देशमुख असले तरी उमेदवारीसाठी त्यांच्यासह रमेश आडसकर, मोहन जगताप, ओमप्रकाश शेटे हे सुद्धा इच्छूक आहेत. देशमुखांची उमेदवारी काटण्यासाठी विरोधकांकडून प्रयत्न होत आहेत. भाजपाची उमेदवारी गृहीत धरून रमेश आडसकर यांनी तर संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला असून तयारीस जोमाने लागले आहेत. प्रचाराची त्यांची गती वाढली आहे.
पालकमंत्र्यांची
कृपादृष्टीही महत्त्वाची
पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे बीड जिल्ह्यावर वर्चस्व आहे. त्यांची नेहमीच ‘किंगमेकर’ची भूमिका राहिली आहे. त्यांच्या कृपादृष्टीशिवाय जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदार संघात विजय मिळविणे अशक्यप्राय आहे. मनात आणले तर अशक्यप्राय विजयही सहज शक्य होतो, हे पंकजांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सुरेश धसांना निवडून आणून आणि जि.प.ची सत्ता हस्तगत करताना महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. तशीच लोकसभाही जिंकून दाखवली.

Web Title: Willing to rise in BJP; Screw in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.