जिल्हा परिषद निवडणूकीसाठी बीडमध्ये ६९ नव्हे ६० गटच राहणार?
By शिरीष शिंदे | Updated: June 5, 2025 19:36 IST2025-06-05T19:36:27+5:302025-06-05T19:36:42+5:30
लोकसंख्येची माहिती पाठवली निवडणूक विभागाला, २०१७ मधील जिल्हा परिषद गट रचना होणार ?

जिल्हा परिषद निवडणूकीसाठी बीडमध्ये ६९ नव्हे ६० गटच राहणार?
बीड : राज्यासह जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचे वारे आता वाहू लागले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक संदर्भाने प्रभाग रचना आणि गट गणाचे प्रारूप तयार ठेवण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे २०२२ मध्ये केलेली गट गण रचना रद्द होणार आहे. त्या ऐवजी २०१७ साली ज्या सदस्य संख्येवर आधारीत रचना करण्यात आली होती त्यावरच आता पुन्हा गण गट रचना होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका या मागील ५ ते ८ वर्षांपासून झालेल्या नाहीत. दरम्यानच्या काळात जिल्ह्यातील ग्रामीण भागाचे शहरी भागात किंवा शहरी भागाचे ग्रामीण भागात समाविष्ट होणे, जिल्ह्यातील व तालुक्यातील काही गावांचा समावेश इतर जिल्ह्यात होणे, नवीन गट ग्रामपंचायतींचे विभाजन होऊन स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात येणे यासह इतर कारणांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकसंख्येत बदल झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राम विकास विभागाने बीड जिल्हा प्रशासनाकडे लोकसंख्येची माहिती मागविण्यात आली होती. त्यानुसार विहित परिशिष्टामध्ये भरून प्रमाणित करून पाठविण्यात आली आहे.
जिल्ह्याची लोकसंख्या २० लाख
सन २०११ च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची लोकसंख्या २० लाख २४ हजार ९० ऐवढी लोकसंख्या होती. २०११ च्या जनगनणेनुसार ग्रामीण क्षेत्राची तालुका निहाय लोकसंख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची आकडेवारी तपासण्यात आली. हीच माहिती ग्राम विकास विभागाला पाठविण्यात आली आहे.
२०२२ मध्ये केली होती ६७ गटांची रचना
२०२२ च्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकासाठी जी प्रभाग रचना आणि गट गण रचना करण्यात आली होती. त्यात २०११ च्या जनगणनेत १० टक्के वाढ झाली असे गृहीत धरून त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांची सदस्य संख्या निश्चित करण्यात आली होती. जिल्हा परिषदांसाठी पूर्वी किमान ५० आणि कमाल ७५ सदस्य असे सूत्र होते. २०२२ मध्ये ते सूत्र बदलून किमान ५५ आणि कमाल ८० असे करण्यात आले होते. त्यामुळे प्रत्येक जिल्हा परिषदेत सदस्यांची संख्या वाढली होती. त्यानुसार बीड जिल्हा परिषदेत ७ सदस्य वाढविण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनाने ६७ गटांची रचना केली होती. मात्र, त्या आधारे निवडणूक झाल्या नाहीत.
यंदाही ६० सदस्य ?
२०२२ च्या रचनेत ६७ जिल्हा परिषद गट प्रस्तावित करण्यात आले होते. आता ते जवळपास बारगळ्यात जमा आहेत. २०१७ च्या सदस्य संख्येवर गट गण अपेक्षित आहेत. २०१७ मध्ये बीड जिल्हा परिषदेत ६० सदस्य होते. त्यात गेवराई ९, बीड ८, आष्टी ७, परळी, अंबाजोगाई, माजलगाव प्रत्येक ६, शिरुर कासार ४, पाटोदा धारुर प्रत्येक ३ तर वडवणी २ अशी सदस्य संख्या होती. आता हीच सदस्य संख्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी ग्राह्य धरली जाईल, अशी शक्यता आहे.