फिर्यादी धनराज सोपान घुले (रा. शिरपूर, तालुका केज) यांची विधवा मुलगी वडवणी येथे काही दिवस वास्तव्यास होती. दोन महिन्यांपूर्वी ती अंबाजोगाई शहरातील जैन गल्ली येथे मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवण्यासाठी भाड्याने जैन गल्ली परिसरात राहत होती. वडवणी येथील बाळू केंगार हा जुन्या ओळखीचा फायदा घेत सदरील विधवा महिलेस फोनवर व प्रत्यक्ष घरी येऊन लगट साधण्याचा प्रयत्न करायचा व महिलेला जाणीवपूर्वक त्रास द्यायचा. या त्रासाबाबत महिलेने आपल्या वडिलांना सांगितले होते. त्यावरून आरोपी केंगार यास आमच्या मुलीला त्रास देऊ नकोस. तिला सुखा समाधानाने जगू द्या म्हणून समजावण्याचा प्रयत्न केला, तर बाळू केंगार याने तुम्ही माझ्यामध्ये पडाल तर जिवे मारण्याची धमकी वडिलांना दिली होती. मंगळवारी सकाळी केंगार हा अंबाजोगाई येथील त्या महिलेच्या घरी आला. त्या दोघांत शाब्दिक बाचाबाची झाली व त्यानंतर चापट-बुक्क्यांनी मारहाण करू लागला.
मारहाण केल्यानंतर मला चहा घ्यायचा आहे, चहा बनव म्हणून सदरील महिलेस सांगितले. घरामध्ये दूध नसल्यामुळे त्या महिलेचा भाऊ दूध आणण्यासाठी बाहेर गेला. परत आल्यानंतर त्याच्या बहिणीने घरात ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. यावेळी बाळू केंगार हा तेथेच होता. बाळू केंगार याने सदरील महिलेच्या भावास तू जर मी इथे आल्याचे पोलिसांना सांगितलेस तर तुला जिवे मारेन, अशी धमकी दिली.
विधवा महिलेचा भाऊ व आरोपी बाळू केंगार याने सदरील महिलेचा गळफास सोडवून उपचारासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी सदरील महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती देताच आरोपी बाळू केंगार हा तिथून पसार झाला, अशी फिर्याद मृत विधवा महिलेच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. बाळू केंगार याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर गव्हाणे करत आहेत.