मनोज जरांगेंसह १२ जण आतमध्ये असताना अचानक लिफ्ट का कोसळली? कारण समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:13 IST2025-08-04T14:12:04+5:302025-08-04T14:13:12+5:30
मनोज जरांगे व त्यांचे सहकारी दुपारी १:३३:४२ वाजता लिफ्टमधून जाण्यासाठी चढले. १:३४ वाजता लिफ्ट सुरू केली. १:३४:०५ सेकंदाने लिफ्ट खाली आदळली.

मनोज जरांगेंसह १२ जण आतमध्ये असताना अचानक लिफ्ट का कोसळली? कारण समोर
बीड : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बीडमधील शिवाजीराव क्रिटिकल केअर रुग्णालयात एका कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी आले असता सुदैवाने एक अपघात टळला. क्षमतेपेक्षा जास्त लोक चढल्याने लिफ्ट अचानक खाली कोसळली. सुदैवाने या घटनेत सर्वजण सुखरूप बचावले.
मनोज जरांगे यांनी रविवारी ग्राउंड फ्लोअरवरून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर केला. जरांगे यांच्यासह सोबतचे कार्यकर्ते, पदाधिकारी लिफ्टमध्ये चढले. परंतु, क्षमतेपेक्षा जास्त लोक लिफ्टमध्ये असल्याने वजन वाढले. त्यामुळे लिफ्ट अचानक पार्किंगपर्यंत खाली आदळली. यामुळे मनोज जरांगे यांच्यासह सहकाऱ्यांना हादरा बसला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी इमर्जन्सी स्विचने लिफ्टचा दरवाजा बाहेरून उघडला आणि मनोज जरांगे यांच्यासह सहकाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर मनोज जरांगे यांनी जिन्याचा वापर करून रुग्णालयात दाखल कार्यकर्त्याची भेट घेतली. यानंतर जरांगे नाशिककडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.
ओव्हरलोडमुळे लिफ्ट आदळली
या लिफ्टची जास्तीत जास्त क्षमता ६८० किलोपर्यंत वजनाची आहे. १० व्यक्ती म्हणजेच एकूण ६८० किलो आहे. परंतु, या लिफ्टमध्ये १२ जण चढले. वजन जास्त झाल्यामुळे ही लिफ्ट खाली आदळल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.
५ सेकंदात लिफ्ट खाली आली
मनोज जरांगे व त्यांचे सहकारी दुपारी १:३३:४२ वाजता लिफ्टमधून जाण्यासाठी चढले. १:३४ वाजता लिफ्ट सुरू केली. १:३४:०५ सेकंदाने लिफ्ट खाली आदळली.
मनोज जरांगे व त्यांचे कार्यकर्ते ग्राउंड फ्लोअरवरून लिफ्टमध्ये चढले होते. ओव्हरलोडमुळे लिफ्ट पार्किंग फ्लोअरवर आदळली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने इमर्जन्सी स्विचद्वारे लिफ्टचा बाहेरून दरवाजा उघडला आणि सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
-महारुद्र मुंडे, रुग्णालय कर्मचारी.