माझ्या मुलाला मोबाईल का विकला ? जाब विचारत केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2022 18:03 IST2022-02-03T18:02:41+5:302022-02-03T18:03:09+5:30
पोलिसांनी तपास करत अवघ्या १२ तासांमध्ये आरोपीस ताब्यात घेतले.

माझ्या मुलाला मोबाईल का विकला ? जाब विचारत केलेल्या मारहाणीत युवकाचा मृत्यू
कडा ( बीड ) : माझ्या मुलाला मोबाईल का विकला ? असा जाब विचारात बेदम मारहाण केल्याने गंभीर जखमी १४ वर्षीय युवकाचा अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान आज सकाळी मृत्यू झाला. लहू लिंबराज खिळदकर असे मृत युवकाचे नाव असून आरोपी राजू खिळदकर यास ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, मृत आणि आरोपी हे भावकीतून काका-पुतण्या लागतात.
आष्टी तालुक्यातील नांदुर ( विठ्ठल ) या गावातील लहू खिळदकरने भावकीतील राजू खिळदकरच्या मुलाला मोबाईल विकला. मात्र, यामुळे राजू खिळदकर संतप्त झाला. त्याने लहूला मंगळवारी घरी बोलावून घेतले. मुलाला मोबाईल का विकला, असा जाब विचारत राजूने लहूला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेतील लहूला अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आज सकाळी उपचारादरम्यान लहूचा मृत्यू झाला.
दरम्यान, अंभोरा पोलिस ठाण्यात मृत युवकाचे वडिल लिंबराज झुंबर खिळदकर यांच्या फिर्यादीवरून राजू खिळदकरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करत अवघ्या १२ तासांमध्ये आरोपीस ताब्यात घेतले. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे करत आहेत.