"माझं लेकरू कुठे शोधू?" सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुख यांच्या आईचा आक्रोश, सारे सुन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 17:18 IST2025-02-18T17:16:38+5:302025-02-18T17:18:25+5:30
"संतोषने संपूर्ण गावाचे भले केले. त्या दिवशी थोडेफार काही वाद झाले असतील, पण त्यासाठी त्याला का संपवलं?

"माझं लेकरू कुठे शोधू?" सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुख यांच्या आईचा आक्रोश, सारे सुन्न
मस्साजोग (बीड) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या भेटीदरम्यान संतोष देशमुख यांच्या आईच्या भावनांचा बांध फुटला. आपल्या मुलाच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले.
संतोष देशमुख यांच्या आईने आपल्या मुलाच्या हत्येमागील अमानुषतेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्या म्हणाल्या, "संतोषने संपूर्ण गावाचे भले केले. त्या दिवशी थोडेफार काही वाद झाले असतील, पण त्यासाठी त्याला का संपवलं? मी त्याची आई आहे, मला आता काय वाटत असेल? माझं लेकरू खूप चांगलं होतं. मी माझं लेकरू कुठे शोधू?" या शब्दांनी उपस्थितांचे मन हेलावले.
संतोष देशमुख यांच्या आईने आरोपींना शिक्षा व्हावी आणि कुटुंबाला संरक्षण मिळावे, अशी मागणी केली. यावर सुप्रिया सुळे यांनी त्यांना दिलासा देत म्हणाल्या, "तुमचं लेकरू परत आणू शकत नाही, पण मी तुमच्या नातवांना नक्की न्याय मिळवून देईन. मी तुमच्यासाठी शेवटपर्यंत लढेन."
आरोपी सापडत नाहीत, यावर विश्वास बसत नाही
सुप्रिया सुळे यांनी संतोष देशमुख यांच्या मुलगा धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख यांच्याशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी आरोपींना पकडण्यात होणाऱ्या विलंबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, "आमचे फोन टॅप करता येतात, मग आरोपी सापडत का नाहीत?" त्यांनी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित करत लवकरात लवकर आरोपींना अटक करण्याची मागणी केली. गावकऱ्यांनी गावात भीतीचे वातावरण असल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी प्रशासनाला कठोर कारवाई करण्याचे आवाहन केले आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत पाठिंबा देण्याचा शब्द दिला.