व्हीलचेअर नावालाच, दिव्यांग, ज्येष्ठांची कसरत - फोटो - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:23 IST2021-02-05T08:23:46+5:302021-02-05T08:23:46+5:30

बीड : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना प्रवास करताना बीड बसस्थानकात मोठी कसरत करावी लागत आहे. येथे कसलाही रॅम्प नाही. तसेच ...

Wheelchair name, Divyang, Seniors exercise - Photo - A | व्हीलचेअर नावालाच, दिव्यांग, ज्येष्ठांची कसरत - फोटो - A

व्हीलचेअर नावालाच, दिव्यांग, ज्येष्ठांची कसरत - फोटो - A

बीड : ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगांना प्रवास करताना बीड बसस्थानकात मोठी कसरत करावी लागत आहे. येथे कसलाही रॅम्प नाही. तसेच व्हीलचेअर नावालाच आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत राज्य परिवहन महामंडळाबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बीड बसस्थानकाचे मागील अनेक वर्षांपासून काम झालेले नाही. सध्या स्थानकाचे नव्याने काम हाती घेण्यात आलेले आहे. नवीन कामासाठी आणखी किमान दोन वर्षे कालावधी लागणार आहे. असे असले तरी सद्य:स्थितीत बीड स्थानकात प्रवाशांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शासनाकडून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी बसमध्ये जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्यांना तिकिटातही सूट दिली आहे. परंतु चढ-उतार अथवा स्थानकात जाताना कसरत करावी लागत आहे. येथे कसलाही रॅम्प नाही. तसेच व्हीलचेअरही स्थानकप्रमुखांच्या कक्षात असते. त्यामुळे तिचा उपयोग कसा करायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. येथे कसलेही फलक नसल्याने सामान्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. यावर वेळीच कारवाई करून सामान्य प्रवाशांचे हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

व्हीलचेअर स्थानकप्रमुखांच्या कक्षात

बीड स्थानकात ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगांसाठी व्हीलचेअर उपलब्ध आहे. परंतु ती कधीच बाहेर नसते. स्थानकप्रमुखांच्या कक्षात ठेवलेली असते. बाहेर फलकही नाही. त्यामुळे हाल होतात. बाहेर ठेवल्यावर गैरवापर होण्याची शक्यता आहे. फलक होता, परंतु कोणी काढला असेल, असा खुलासा आगारप्रमुखांकडे देण्यात आला आहे.

कोट

बीड स्थानकात रॅम्प नाही. व्हीलचेअर आहे. बाहेर ठेवल्यावर गैरवापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती स्थानकप्रमुखांच्या कक्षात असते. ज्यांना आवश्यकता आहे, अशांना ती दिली जाते. माहिती देणारा फलक होता; परंतु तो कोणी फाडला असेल.

निलेश पवार

आगारप्रमुख, बीड

कोट

बीड स्थानक म्हणजे समस्यांचे माहेरघर आहे. येथे कसल्याच सुविधा नाहीत. बसमध्ये चढ-उतार करण्यासह चालतानाही कसरत करावी लागते. व्हीलचेअर आहे की नाही, याचीही माहिती येथे दिलेली नाही. नाइलाजाने बसने प्रवास करावा लागतो.

मंगेश काळे

दिव्यांग प्रवासी, उस्मानाबाद

कोट

काठी टेकवत टेकवत स्थानक गाठतो. बसच्या दरवाजात जाईपर्यंत तरुण लोक पुढे पळतात. कोणी धक्का देते तर कोणी बसमध्ये चढू देत नाही. उशिरा गेल्यास जागा भेटत नाही. राखीव जागेवर धडधाकट बसलेले असतात. आम्हाला कसल्याच सुविधा नाहीत.

राधाकिशन माने, ज्येष्ठ नागरिक

रोज प्रवास करणारे प्रवासी - ६०००

स्थानकात रोज ये-जा करणाऱ्या बसेस - ४००

Web Title: Wheelchair name, Divyang, Seniors exercise - Photo - A

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.