कोरोना असल्यामुळे काय झालं? गॅप का घ्यायचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:31 IST2021-03-24T04:31:06+5:302021-03-24T04:31:06+5:30
बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही पाठ सोडत नाही. कोरोनामुळे या वर्षी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये काही महिने सुरू होती. ...

कोरोना असल्यामुळे काय झालं? गॅप का घ्यायचा?
बीड : कोरोना विषाणूचा संसर्ग अद्यापही पाठ सोडत नाही. कोरोनामुळे या वर्षी शाळा, कनिष्ठ महाविद्यालये काही महिने सुरू होती. मात्र शिक्षणाची लिंक लागली नाही. त्यामुळे दहावी आणि बारावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांपुढे परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे आव्हान होते. मात्र ऑनलाइन आणि स्वयं अध्ययनामुळे विद्यार्थ्यांनी होईल तेवढ्या अभ्यासाच्या बळावर परीक्षा देण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून येत आहे. वर्ष कशामुळे वाया घालवायचे, अशा विचारातून गॅप न घेता परीक्षेची तयारी करत आहेत. त्यामुळे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थीसंख्येत घट अथवा वाढ न होता, गतवर्षी मागील वर्गात प्रविष्ट मुले यंदा दहावी आणि बारावीची परीक्षा देणार आहेत. गतवर्षी ऐन परीक्षेच्या अंतिम टप्प्यात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला होता. दहावीच्या परीक्षेत ४३,१०५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ४२,७८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. निकाल ९१.२४ टक्के लागला. तर बारावीसाठी ३९,१५६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ३८,८८६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकाल ८८.८३ टक्के लागला.
चालू वर्षात मात्र शाळा जूनऐवजी नोव्हेंबरमध्ये सुरू झाल्या. त्यातही उपस्थितीचे प्रमाण कमीच राहिले. मात्र सुरुवातीपासून ऑनलाइन अभ्यास बहुतांश मुलांना करता आला. त्यामुळे परीक्षा देण्याचा निर्णय या विद्यार्थ्यांनी घेतला आहे.
---------
शाळांकडून समुपदेशनामुळे टळला गॅप
बहुतांश मुलांना विविध कारणांमुळे ऑनलाइन अभ्यास करता आला नाही, ही प्रणाली प्रभावी ठरली नाही. अनेक मुलांनी घरी अभ्यास केला नाही, शाळा नाही, अन शिकवणी नसल्याने आपल्या पाल्याने गॅप घ्यावा, असे पालकांना वाटत होते. मात्र हे प्रमाण एक ते दोन टक्के होते. अशा पालकांना कोरोनामुळे शासनाकडून सवलत दिली जाईल, संधी मिळेल, ती कशाला हुकवता, मुलांचे वय वाढते, त्यांचे आत्मबल खचू देऊ नका अशा रीतीने समजावून सांगून समुपदेशन केल्याने पालकांनी ऐकले. त्यामुळे गॅप घेणाऱ्यांची संख्या नसल्यातच जमा असल्याचे द्वा. मंत्री राजस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक दिगांबर अंकुशे यांनी सांगितले. तर गॅपसाठी इच्छुक पालकांना समजावून तसेच आग्रह करून त्यांच्या पाल्यांचे परीक्षा अर्ज भरून घेतल्याचे संस्कार विद्यालयाचे सहशिक्षक विनायक जोशी यांनी सांगितले.
संधी आली चालून
मागील वर्षी दहावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी ऑक्टोबरच्या परीक्षा दिल्या. यात ते उत्तीर्ण झाले. त्यांना नियमानुसार अकरावीच्या वर्गात प्रवेश देण्यात आला. तर काहींनी इतरत्र जेथे प्रवेश सुरू होते, तेथे प्रयत्न करून पुढच्या शिक्षणाचा प्रवास सुरू केला. काही मुलांना तर तंत्रनिकेतनला प्रवेश मिळाला, असा अनुभव प्रथमच आला आहे. मागील वर्षी नापासांचे प्रमाणही अत्यंत कमी होते. त्यामुळे पुनर्परीक्षार्थींची संख्या फारशी नसणार आहे.
दहावीचे परीक्षार्थी
२०२०- ४२७८८
२०२१ - ४३९८५
बारावीचे परीक्षार्थी
२०२० - ३८८८६
२०२१- ४१२००