श्री गजानन महाराजांच्या पालखीचे प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 00:09 IST2019-06-26T00:07:25+5:302019-06-26T00:09:15+5:30
श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी सायंकाळी प्रभू वैद्यनाथांच्या परळीत आगमन झाले.

श्री गजानन महाराजांच्या पालखीचे प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत स्वागत
परळी (जि. बीड) : श्री क्षेत्र शेगाव येथून आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे मंगळवारी सायंकाळी प्रभू वैद्यनाथांच्या परळीत आगमन झाले. अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे,तालुकाध्यक्ष विश्वांभर महाराज उखळीकर,नगरसेवक गोविंद मुंडे,सुरेश महाराज मोगरे,आशोक महाराज कराळेसह भाविकांनी पालखीचे स्वागत केले.
या पालखीत आठशे वारकरी सहभागी झाले आहेत. थर्मलच्या ऊर्जानगर वसाहतीत ही पालखी दाखल झाली. न्यू हायस्कूल शाळेत या पालखीचा मुक्काम होता. पालखी आगमनापासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची दर्शनासाठी रिघ लागली होती. उपस्थित लहान थोर भक्तांच्या मुखातून ‘जय गजानन’ ‘श्री गजानन’ असा जयघोष होत होता. यामुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.
बुधवारी सकाळी ही पालखी शहरात येणार असून संत जगमित्र नागा मंदिरात पालखीचा मुक्काम असणार आहे. मोंढा टॉवर, गणेशपार, अंबेवेस, वैद्यनाथ मंदिरमार्गे पालखी जगमित्र नागा मंदिरात विसावा घेणार आहे. तेथे दिवसभर भाविकांना दर्शन घेता येईल. गुरूवारी सकाळी कन्हेरवाडी मार्गे अंबाजोगाईकडे श्री. संत गजानन महाराजांची पालखी मार्गस्थ होणार आहे.