आठवडी बाजार बंद; गुजरी बाजार सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:49+5:302021-06-20T04:22:49+5:30
अनिल महाजन लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : कोरोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार बंदचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊनमध्ये सवलतीच्या ...

आठवडी बाजार बंद; गुजरी बाजार सुसाट
अनिल महाजन
लोकमत न्यूज नेटवर्क
धारूर : कोरोना संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार बंदचे आदेश दिले आहेत. लॉकडाऊनमध्ये सवलतीच्या काळात जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ विक्रीसाठी मुभा दिलेली आहे. या कालावधीत भरणारे गुजरी बाजार मात्र सुसाट आहेत. आठवडी बाजार अद्यापही बंद असल्याने ग्रामीण अर्थचक्र लॉकडाऊनमध्ये रुतलेलेलच आहे, तर भरणाऱ्या गुजरी बाजारात ग्राहकांसह व्यापारी कोरोनाचे भान विसरून व्यवहार करत आहेत. या गर्दीला रोखणे प्रशासनापुढे आव्हान आहे.
नगर परिषदेजवळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोमवार व शुक्रवार दोन दिवस आठवडी बाजार भरतो. मात्र लॉकडाऊनमुळे आठवडी बाजार बंद आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांचे प्रमाण कमालीचे कमी आहे. त्याचबराेबर बाजारात विविध व्यवसाय करणारे व्यापारीदेखील बंदमुळे इकडे फिरकत नाहीत. सध्या भाजीपाला विक्रेते दररोज हनुमान चौकात सकाळी गर्दी करतात. पोलीस, नगर परिषद किंवा तहसील प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी येताच येथील विक्रेते धावपळ करतात. नागरिकांनीही या त्रासाला कंटाळून गुजरी बाजार बंद करण्याची मागणी केली होती. दरम्यान, १८ जूनपासून ही गर्दी रोखण्यासाठी नगर परिषदेने नेहमीच्या ठिकाणी गुजरी बाजाराचे नियोजन केले आहे. परंतु या ठिकाणीही कोरोनाचे नियम पायदळी तुडविल्याचे दिसून आले.
विक्रेतेही बेफिकीर
कुठेही गुजरी बाजार भरत असल्याने व भाजीपाला व फळ विक्रेत्यांकडून दररोजच नियमांचे उल्लंघन होत असल्याने व्यापारी, नागरिक त्रस्त आहेत. नगर परिषदेने ताकीद दिल्याने हनुमान चौकाऐवजी लगतच्या परिसरात फळे, भाजीपाला विक्रेते बसले. मात्र मास्क, सॅनिटायझरचा वापर होताना दिसला नाही.
ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग
धारूरच्या शुक्रवारच्या गुजरी बाजारात गर्दी झाली. अनेकांनी मास्कही घातले नव्हते. नगर परिषदेने व्यवस्थित नियोजन केल्याने थोडा सुरळीतपणा दिसत होता. मुख्य रस्त्यावरील रोजची गर्दी कमी झाली होती. नागरिक मात्र कोरोनाचे कोणतेही नियम न पाळता बिनधास्तपणे फिरताना दिसत होते.
बाजार बंदमुळे उलाढालीला फटका
आठवडी बाजार बंद असल्याने ग्रामीण जनतेची गैरसोय होत आहे. शेतातील पिकवलेला माल विकण्यासाठी कसरत करावी लागत आहे. तसेच व्यावसायिकांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. बाजार सुरू करावा तर कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आणि बंद ठेवला तर व्यापारी व्यावसायिकांना फटका अशा स्थितीत संभाव्य तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू आहे.
नगर परिषदेकडून जागेचे नियोजन
धारूर शहरातील नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंची सोय व्हावी व कोरोना नियमांचे पालन व्हावे, या हेतूने नगर परिषदेने भाजीपाला व फळ विक्रेत्यांना सोशल डिस्टन्सचे पालन करीत बसण्याची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे.
- नितीन बागुल, मुख्याधिकारी, नगर परिषद, धारूर
===Photopath===
190621\19bed_1_19062021_14.jpg