'खोक्या'च्या घरात वाळलेले मांस अन् शिकारीचे जाळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 11:40 IST2025-03-09T11:40:09+5:302025-03-09T11:40:21+5:30
वन विभागाकडून झाडाझडती : हत्यारासह जप्त केले शिकारीसाठी लागणारे इतर साहित्य

'खोक्या'च्या घरात वाळलेले मांस अन् शिकारीचे जाळे
बीड : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश ऊर्फ खोक्या निराळ्या भोसले याच्या शिरूर येथील घरात दोरीवर वाळत असलेले मांस, शिकारीचे जाळे, सत्तूर यासह इतर साहित्य आढळले. वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी केलेल्या कारवाईत हा प्रकार समोर आला. खोक्याच्या घरातून सर्व साहित्य जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी त्याच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सतीश भोसले याच्या घरामध्ये शिकार करण्यासाठीचे साहित्य असल्याची माहिती गोपनीय सूत्रांनी वन विभागाला दिली. त्यानुसार, वन विभागाच्या ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शनिवारी सकाळी १०:३० वाजता भोसले याच्या शिरूर येथील घरावर छापा टाकला. त्यावेळी दोरीवर वाळत असलेले मांस, तीन वाघुरे, पक्षी पकडण्याचे दोन पिंजरे, एक सत्तूर, एक कत्ती, एक डबा, दोन फासे पिंजरे, दोन पाकिटे असे साहित्य आढळले. हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई विभागीय वन अधिकारी अमोल गर्कळ यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
'तो हरीण मारतो अन्...'
बीड : शिरूरकासार तालुक्यात दहशत निर्माण करण्यासह हरणांची तस्करी करून त्यांची शिकार करणारा खोक्या भोसले हा कुख्यात गुंड आहे. तो हरीण मारून त्याचे मांस एक ते दोन दिवसाला डब्यात घालून भाजपचे आमदार सुरेश धस यांना देतो. खोक्याचा आका सुरेश धस आहेत. त्यामुळे त्यांनाही यात सहआरोपी करावे, अशी मागणी ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. टी. पी. मुंडे यांनी केली.
खोक्या भोसले याचे एका व्यक्तीला अर्धनग्न करून बेदम मारहाण करणे तसेच अनेक कारनाम्यांचे कथित व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर त्याच्यावर शिरूर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले होते. खोक्यावर मकोका लावावा. तसेच यासाठी आपण मंगळवारी मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याचे प्रा. मुंडे यांनी सांगितले.
घरात वाळलेले मांस कोणत्या प्राण्याचे आहे, हे तपासण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथील फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात येत आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पाटोदाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत काळे यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.