"आम्ही इथे विटी दांडू, पतंग, गोट्या उडवायला आलो नाहीत", अजित पवार बीडमध्ये स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:02 IST2025-01-30T11:02:09+5:302025-01-30T11:02:42+5:30
बीडच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यादांच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या सुरूवातीलाच त्यांनी भूमिका स्पष्ट केली.

"आम्ही इथे विटी दांडू, पतंग, गोट्या उडवायला आलो नाहीत", अजित पवार बीडमध्ये स्पष्टच बोलले
Ajit Pawar Beed: 'मी भेदभाव करणार नाही. पण, ज्याचं काम करतो त्याने खाली तिसरचं काही केलं, तर मी काम करणार नाही. मी काही साधू-संत नाहीये", असे म्हणत उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्याच्या पहिल्याच दौऱ्यात भूमिका स्पष्ट केली. अजित पवारांनी कार्यकर्त्यांनाही चारित्र्य आणि प्रतिमा चांगले ठेवा, असेही सांगण्यात आले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बीडमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "मी आलो की, मला भला मोठा हार द्यायचा. मला मोठा बुके द्यायचा. मला मूर्त्या द्यायच्या. विठ्ठलाची द्यायची, पण त्यांनी काय सांगितलं, ते पण बघा ना. साधुसंताचे काय विचार आहेत. फार तुम्ही अपेक्षा करताहेत. आता काय दादा आले. आता काही नाही. तर डोक्यातून काढा. मी जरी तुमच्या जवळचा असलो, तरी चुकीचं वागू नका", अशा शब्दात अजित पवारांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले.
दुटप्पी वागला तर काम करणार नाही -अजित पवार
"मी लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेईन. भेदभाव केला जाणार नाही. पण, मी ज्याचं काम करतो त्यानेही भेदभाव केला नाही पाहिजे. नाहीतर मी ज्याचं काम करतो तो खाली तिसरंच काहीतरी करणार. तसं मी खपवून घेणार नाही. मी सरळ सांगणार की, तू जर दुटप्पी वागणार असेल, तर मी काही काम करणार नाही. मी काही साधू-संत नाही", असे म्हणत अजित पवारांनी अप्रत्यक्षपणे इतर पक्षाच्या आमदारांनाही इशारा दिला.
तुम्हाला आमचा आधार -पवार
"जो संख्येने कमी असेल, त्याला भीती वाटत असेल की मी कसं जगायचं. मला काय आधार आहे. तुम्हाला सरकारचा आधार आहे. तुम्हाला आमचा आधार आहे. आम्ही इथे काही विटीदांडू, पतंग, गोट्या उडवायला आलेलो नाहीत. आम्ही इथे कामासाठी आलोय. मला काम करायला आवडतं", असे म्हणत अजित पवारांनी आश्वस्त केले.
"चारित्र्य स्वच्छ ठेवा, पोलीस विभागात राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही"
"राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना सांगतोय की, आपापलं चारित्र्य स्वच्छ ठेवा. आपापली प्रतिमा लोकांमध्ये चांगली ठेवा. चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये. त्यासंदर्भात काळजी सर्वांनी घ्यावी. उद्या कुठल्या बाबतीत मला कळलं, तर मी आजच पोलिसांना सांगणार आहे की, राजकीय हस्तक्षेप पोलीस विभागात होऊ देणार नाही. महायुतीच्या कुणाकडूनच होऊ देणार नाही. मी देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेंनाही विनंती करणार आहे की, अन्याय कुणावर होऊ द्यायचा नाही, पण यात कुणी भरडला देखील जाता कामा नये. हे नव्याचे नऊ दिवस नाहीत. हे सातत्य पुढे राहायला पाहिजे", असे अजित पवार कार्यकर्त्यांना म्हणाले.