खंडेश्वरीदेवीचा मार्ग यंदाही खडतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:21 IST2018-10-09T00:20:59+5:302018-10-09T00:21:38+5:30
शहराचे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी मोतच्या शारदीय नवरात्र उत्सवास बुधवारपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. मात्र, काळा हनुमान ठाणा ते मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम राजकीय गटबाजीत अडकल्याने अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे यंदाही खंडेश्वरी देवीच्या भक्तांचा मार्ग खडतर असल्याचे दिसत आहे.

खंडेश्वरीदेवीचा मार्ग यंदाही खडतर
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : शहराचे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी मोतच्या शारदीय नवरात्र उत्सवास बुधवारपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. मात्र, काळा हनुमान ठाणा ते मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम राजकीय गटबाजीत अडकल्याने अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे यंदाही खंडेश्वरी देवीच्या भक्तांचा मार्ग खडतर असल्याचे दिसत आहे.
डोंगराळ परिसरात वसलेल्या खंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे उत्सवाची तयारी सुरु आहे. उत्सव काळात या परिसराला जत्रेचे स्वरुप येते. एमआयडीसी रोड तसेच गांधीनगरमार्गे शहरातील भाविकांना जाण्यासाठी रस्ते आहेत. त्याशिवाय महत्त्वाचा पेठ भागातून जाणारा काळा हनुमान ठाणामार्गे असलेला रस्ता शहरातील जवळपास सर्वच भाविकांसाठी कमी अंतराचा आहे. रोज नवसपूर्तीसाठी जाणारे आणि कुटुंबासह पायी जाणारे भाविकही याच रस्त्याने जातात. त्यामुळे पहाटेपासून रात्रीपर्यंत वर्दळ असते. मात्र, हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत.
यंदा मुख्यमंत्री निधीतून या रस्त्याचे काम सुरु होत असतानाच टेंडरवरुन आक्षेप घेण्यात आले. नगर पालिकेतील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. या राजकारणात रस्त्याचे काम अचानक थांबले आहे. त्यामुळे रस्ता आहे तसाच खराब आहे. टेंडर आणि राजकारण बाजूला ठेवत या रस्त्याचे काम प्राधान्याने गरजेचे असताना मात्र, मात्र दोन्ही बाजूंकडून मौन बाळगले जात आहे. आता काम सुरु केलेतरी ते तीन-चार दिवसात पूर्ण होणे अशक्य असल्याने यंदाही खंडेश्वरीच्या दर्शनासाठी भाविकांची वाट खडतर राहणार असल्याचे रस्त्याची दुरवस्था पाहिल्यानंतर स्पष्ट दिसत आहे. दोन दिवसात तातडीने कोणते उपाय करता येतील या दृष्टीने प्रशासन व नगर परिषदेने लक्ष घालण्याची गरज आहे. तसेच सर्व पथदिवे चालू करण्याची गरज आहे.
खंडेश्वरीसाठी २५ तोळ्यांचा सुवर्णहार
४श्री खंडेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मागील काही दिवसांपासून उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. विश्वस्तांसह कार्यकर्ते कामात व्यस्त आहेत. यंदा माता खंडेश्वरीच्या दागिन्यात वाढ करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने पुणे येथील एका सराफ्याकडून २५ तोळ्यांचा फुलांची डिझाईन असलेला सुवर्णहार, तर बीड येथील सराफ्याकडून वाटीच्या आकारातील डोरले तयार करण्यात आले आहे. ८ लाख ३० हजार रुपयांचा सुवर्ण हार आणि १ लाख ८० हजाराचे डोरले असल्याचे सांगण्यात आले.