शेततळ्याच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा मिळाला मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:32 IST2021-04-11T04:32:57+5:302021-04-11T04:32:57+5:30

नितीन कांबळे कडा : दुष्काळी भाग असलेला आष्टी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागायची, तिथे शेतीला पाणी आणायचे ...

The way to get sustainable agriculture through farming | शेततळ्याच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा मिळाला मार्ग

शेततळ्याच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा मिळाला मार्ग

नितीन कांबळे

कडा : दुष्काळी भाग असलेला आष्टी तालुक्यात जिथे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागायची, तिथे शेतीला पाणी आणायचे कुठून, असा प्रश्न कायम समोर असल्याने आणि पावसाचे प्रमाण कमी होत गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला होता. फळबाग शेती व हंगामी पिके घेताना पाण्याची चिंता भेडसावत होती; पण कृषी विभागाच्या योग्य सल्ल्याने तालुक्यातील २२९१ शेतकऱ्यांनी शेततळी खोदली.

शाश्वत शेती करण्यासाठी शेततळ्यांचा मार्ग काढल्याने आता शेतकरी यामुळे अडचणीतून थोड्याफार प्रमाणात का होईना बाहेर पडताना दिसत आहे.

आष्टी तालुक्यातील शेतकरी शेतीला किंवा फळबागेला पाणी नसल्याने हंगामी पिकाला महत्त्व देऊन शेती करायचे; पण कृषी विभागाने वेळोवेळी जनजागृती करून विविध योजनांच्या माध्यमातून शेततळी खोदून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले होते. मागील पाच वर्षांत तालुक्यातील २२९१ एवढी शेततळी शेतकऱ्यांनी खोदून पाणी टंचाईवर मात करून पाच हजार एकर क्षेत्रावरील फळबागा जोपासल्या आहेत.

एरवी पाण्याअभावी फळबागा जळून जायच्या; पण आता पाण्याअभावी फळबागांना कसलीच भीती राहिली नाही. शेतकऱ्यांना शेततळ्यांच्या माध्यमातून शाश्वत शेतीचा मार्ग मिळाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार शेततळे उभारले. आज त्यामुळे कसलीच पाणी टंचाई भासत नसल्याचे व शेतीला पाणी भरपूर देता येत असल्याचे मातावळी येथील शेतकरी रामदास बांगर यांनी लोकमतला सांगितले.

भविष्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर शेततळी खोदून पाण्याचा साठा करून शेतशिवार बहरण्यासाठी पुढे यायला हवे. त्याचबरोबर पावसाळी हंगामातील पाण्याने शेततळी भरून घ्यायला हवीत. कृषी विभागाचे वेळोवेळी सहकार्य आहेच, काही अडचण भासल्यास कृषी विभागाचा सल्ला घ्यावा, असे आवाहन देखील आष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी केले आहे.

या योजनेतून खोदलेली शेततळी

सामूहिक शेततळी- ४७५,

अस्तिकरणसहित शेततळी- ३८,

फक्त अस्तिकरण शेततळी-४१,

फक्त खोदकाम केलेली शेततळी- ४७६,

मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत शेततळी-१२६१.

===Photopath===

100421\20210410_102332_14.jpg

Web Title: The way to get sustainable agriculture through farming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.