निधी उचलूनही पाणीपुरवठा योजना अपूर्ण; समितीवर होणार गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 19:08 IST2018-05-30T19:08:53+5:302018-05-30T19:08:53+5:30
वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २००७ मध्ये मंजूर केलेल्या ५७ पैकी ५५ लाख रुपयांचा निधी उचलून योजनेचे काम अर्धवट केले आहे.

निधी उचलूनही पाणीपुरवठा योजना अपूर्ण; समितीवर होणार गुन्हा दाखल
बीड : वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील पाणीपुरवठा योजनेअंतर्गत २००७ मध्ये मंजूर केलेल्या ५७ पैकी ५५ लाख रुपयांचा निधी उचलून योजनेचे काम अर्धवट केले आहे. परिणामी ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारींमुळे जिल्हा परिषद प्रशासन बेजार झाले असून आठवड्यात काम पूर्ण न केल्यास फौजदारी कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिले आहेत.
पाणीपुरवठा योजनेसाठी पिंपरखेड येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीला २७ आॅक्टोबर २०१७ रोजी ५७ लाख रुपयांचा निधी ग्रामपंचायतीकडे वर्ग केला होता. समितीच्या पदाधिका-यांनी त्याच दिवशी यातील ५५ लाख रुपये उचलले होते. टाकीचे अर्धवट काम तसेच रखडले आहे.
पाणी वितरण व्यवस्था केली नाही तसेच संपूर्ण गावभर पाईपलाईन करणे आवश्यक असताना तसे न करता योजना पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकदा तक्रारी केल्या. परंतु जि.प. कडून समितीशी पत्रव्यवहार केला जात आहे. अखेर १९ मे रोजी उपोषण करण्यात आले. पिंपरखेड व परिसरात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. हातपंप कोरडे पडले आहेत. गावाला पाणी पुरवठा योजना मंजूर असल्याने टॅँकरद्वारे पाणी पुरवठा करता येत नाही. त्यामुळे टंचाईला वैतागलेले ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
मालमत्तेवर निधीचा बोजा
समितीच्या कारभाराबद्दल तक्रारी वाढत असल्याने जि. प. प्रशासनाला जनतेच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंत्यांनी समितीच्या अध्यक्ष व सचिवांना प्राप्त निधीतून योजनेची कामे आठ दिवसात पूर्ण करुन घेण्याचे निर्देश दिले. नसता निधी वसुलीसाठी फौैजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. निधीचा बोजा संबंधितांच्या मालगीच्या स्थावर मालमत्तेवर चढवण्याची शिफारस प्रशासनाकडे करण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद केले आहे.
गुन्हा नोंद न झाल्यास आंदोलन
शासनाच्या निधीचा गैरवापर केल्याप्रकरणी ग्राम पाणी पुरवठा समितीच्या सर्व सदस्यांवर गुन्हा दाखल करावा. तसेच सरपंच व ग्रामसेवकाने ग्रामपंचायतच्या खात्यातील रक्कम काहीच कामे न करता समितीला दिली, त्यामुळे सरपंच व ग्रामसेवकावरही कारवाई करावी. दोषींवर गुन्हा नोंद न झाल्यास महिला, पुरुष ग्रामस्थांसोबत पाणी मांगो आंदोलन करावे लागेल.
- राम शिंदे, पिंपरखेड