वॉर्डबॉयची मुजोरी; नर्सची छेड तर लिपिकाला शिवीगाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST2021-04-10T04:33:35+5:302021-04-10T04:33:35+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयातील रोज नवनवीन धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर येत आहेत. एका वॉर्डबॉयने कर्तव्यावर असताना नर्ससोबत गैरवर्तन केले. तर ...

वॉर्डबॉयची मुजोरी; नर्सची छेड तर लिपिकाला शिवीगाळ
बीड : जिल्हा रुग्णालयातील रोज नवनवीन धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर येत आहेत. एका वॉर्डबॉयने कर्तव्यावर असताना नर्ससोबत गैरवर्तन केले. तर दुसऱ्याने पगारावरून लिपिकाला शिवीगाळ केली. कोरोना काळात भरती झालेले वॉर्डबॉय हे रुग्ण वाऱ्यावर सोडून कायम इतरत्र फिरत असतात. मागील काही दिवसांपासून वॉर्डबॉयच्या तक्रारी वाढत असल्याचे दिसत आहे.
जिल्ह्यातील वाढती कोरोनासंख्या पाहता परिचारिका, वॉर्डबॉय, डॉक्टरांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आलेली आहे. परंतु ठराविक काही कर्मचाऱ्यांमुळे इतर कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपासून एका वॉर्डबॉयने पहाटे २ ते सकाळी ८ या ड्यूटीत कर्तव्यावर असलेल्या एका नर्ससोबत गैरवर्तन केले. तिचे फोटो काढून मारण्याची धमकी दिली, तसेच पैसेही मागितले. या प्रकाराने घाबरलेल्या नर्सने हा प्रकार तात्काळ इन्चार्जला सांगितला. त्यानंतर शुक्रवारी सकाळीच जिल्हा शल्य चिकित्सकांकडे धाव घेत लेखी तक्रार केली. परंतु जिल्हा शल्य चिकित्सक हे केंद्रीय पथकासोबत तर अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड हे कोरोना वॉर्डमध्ये होते. त्यामुळे ही तक्रार आवक जावक विभागात नोंद झाली आहे. अद्याप याच्या चौकशीला सुरुवात झाली नसून संबंधित वॉर्डबॉय सध्या फरार असल्याचे सूत्रांकडून समजते.
दुसऱ्या घटनेत पगारावरुन वॉर्डबॉयने लिपिकाला शिवीगाळ केली आहे. अधिकारी सोडून लिपिकाला उद्दिष्ट करुन वॉर्डबॉयने हा प्रकार मद्यपान करुन केल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत एका अधिकाऱ्याला याची माहिती दिली असली तरी लेखी तक्रार अद्याप करण्यात आलेली नाही. या दोन्ही घटनेमुळे परिचारिका सध्या भितीयूक्त वातावरणात कर्तव्य बजावत आहेत. तर काही वॉर्डबॉय याच परिचारिकांच्या पाठिशी भावाप्रमाणे उभा रहात असल्याचेही सांगण्यात आले. त्यांचे कामही कौतुकास्पद आहे. परंतु, अशा मुजोर व मद्यपी वॉर्डबॉयमुळे त्यांचीही प्रतिमा मलीन होत आहे.
यापूर्वी मदत केंद्रातील कर्मचाऱ्याला मारहाण
काही दिवसांपूर्वीच मदत केंद्रात कर्तव्य बजावणाऱ्या एका कर्मचाऱ्याला अहवाल घेण्यावरुन एका वॉर्डबॉयने शिवीगाळ करुन मारहाण केली होती. यात जिल्हा शल्य चिकित्सकांसह इतर अधिकाऱ्यांनी धावही घेतली होती. परंतु संबंधित कर्मचाऱ्याने लेखी तक्रार न दिल्याने त्या वॉर्डबॉयवर कारवाई झाली नाही.
मुकादमाला पाजली दारु?
नर्सची छेड काढणाऱ्या वॉर्डबॉयची ड्यूटीही नव्हती. परंतु आपण मुकादमाला दारू पाजली. आपल्याला कोणीच काही करु शकत नाही, असे म्हणत त्याने नर्सला धमकी दिली होती. ६ तासांच्या ड्यूटीत त्या पीडित नर्सला मोठा त्रास सहन करावा लागला आहे. झालेला त्रासाबद्दल आपण इथे लिहू शकत नाही, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. या वॉर्डबॉयवर मुकादमांचे नियंत्रण असते. परंतु त्यांचे 'अर्थ'पूर्ण दुर्लक्ष होत असल्याने प्रामाणिक काम करणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.