पायी दिंडी चुकल्याची वारकऱ्यांना हुरहूर - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:11+5:302021-07-02T04:23:11+5:30
शिरूर कासार : शेकडो वर्षांची परंपरा असलेला वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला आहे. कोरोनामुळे यंदाही पायी ...

पायी दिंडी चुकल्याची वारकऱ्यांना हुरहूर - A
शिरूर कासार : शेकडो वर्षांची परंपरा असलेला वारकऱ्यांचा पायी दिंडी सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला आहे. कोरोनामुळे यंदाही पायी वारी होत नसल्याच्या असह्य वेदना सहन नाही होत नाहीत, अशा नि:शब्द भावना वारकरी व्यक्त करीत आहेत. गेल्या वर्षीप्रमाणेच यावर्षीही वारी चुकली जात असल्याने वारकऱ्याची वळकटीदेखील अडगळीला पडली आहे.
अवघ्या जगाचे लक्ष बनून राहिलेला ज्ञानोबा, तुकोबांचा पालखी सोहळा आता अवघ्या चार दिवसांवर आला असल्याने वारकऱ्यांना वारीचे डोहाळे लागले आहेत. परंतु कोरोना महामारीमुळे यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शासनाने पायी वारीवर निर्बंध घातले गेले. मोजक्याच उपस्थितीत आणि तेदेखील एसटीने पालखी सोहळा औपचारिकता पूर्ण करणार आहे. लाखो भाविकांसमवेत टाळ-मृदंग आणि अभंग म्हणत ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता कुठल्याही निमंत्रणाशिवाय पालखी सोहळ्यात सहभागी होऊन आनंदलहरीची अनुभूती वारकरी घेत असतो. एकदा का पायी वारी झाली की स्वत:ला कृतकृत्य झाल्याचा भाव प्रगट होत असतो. .... दोन वर्षांपासून वारी चुकली मी चार वेळेस या सोहळ्यात पायी गेलो. मध्यंतरी एक, दोन वर्षे जाता आले नाही. यावर्षी नक्की जायचे ठरवले होते. परंतु कोरोना आडवा आल्याची भावना सचिन भांडेकर व ऋषी दगडे यांनी व्यक्त केली. .. आनंदाला पारखे झाल्याची खंत जीवनातील अत्युच्च आनंदाची अनुभूती आणि ते ठिकाण म्हणजे माऊलीसोबत केलेली पायी वारी होय. साक्षात पांडुरंग परमात्मा भेटीचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येतो. असा सच्चिदानंद जगात कुठेही मिळत नाही. वारीत गेल्यावरच मिळतो. तो आनंद मी अनेक वर्षे अनुभवला. मात्र या आनंदाला आता पारखे झाल्याचे दुःख आहे. पुढील वर्षी तरी हे दुःख आम्हाला देऊ नको, ही विठ्ठलचरणी प्रार्थना. -दत्तातय परदेशी, सेवानिवृत्त शिक्षक. ... सेवेला पारखे माझ्या वडिलांनंतर मी पालखी सोहळ्यातील संत महादेव कासार दिंडीची व्यवस्था जबाबदारी सांभाळत आहे. चारशे वारकऱ्यांचे एक कुटुंब या वारीच्या कालावधीत जे समाधान देते ते शब्दात सांगता येत नाही. परंतु दोन वर्षे झाले या सेवेला आम्ही पारखे झालो, असे दिंडी चालक गिरीश अंभोरे यानी सांगितले. ... निर्बंधामुळे दिंडी नाही शासन निर्बंधांमुळे पालखी सोहळ्यात जाता येत नाही. ही त्या विठ्ठलाचीच इच्छा समजून पुढच्या वर्षी तरी आमचा असा अव्हेर करू नको, अशी प्रार्थना ज्ञानोबा, तुकोबांच्या माध्यमातून विठ्ठलाकडे करतो, असे नारायण महाराज डिसले यांनी सांगितले.