लायसन्स काढायचे? एजंट लावावा लागेल; तो पुढे चालेल, तुम्ही मागे !

By शिरीष शिंदे | Published: December 25, 2023 03:51 PM2023-12-25T15:51:22+5:302023-12-25T15:52:16+5:30

बीडच्या आरटीओ कार्यालयात एजंटाशिवाय होईनात कामे; अधिक दर घेत असल्याचा सर्वसामान्यांचा आरोप

want driving license? An agent has to be applied in Beed RTO; He will go forward, you behind! | लायसन्स काढायचे? एजंट लावावा लागेल; तो पुढे चालेल, तुम्ही मागे !

लायसन्स काढायचे? एजंट लावावा लागेल; तो पुढे चालेल, तुम्ही मागे !

बीड : पूर्वी वाहन परवाना काढण्यासाठी एजंटाशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे अनेक आरटीओ एजंट लखपती झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. आता वाहन परवाना काढण्यासाठी प्रक्रिया ऑनलाइन झाली असली तरी एजंटची मदत घ्यावीच लागते. तसेच रजिस्ट्री कार्यालयात एजंट ॲक्टिव्ह असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले. त्यांच्यामार्फत गेले तर कामे लवकर होतात असा अनेकांचा समज आहे. परंतु, सर्वसामान्य नागरिकसुद्धा स्वत: कागदपत्रे आरटीओ कार्यालयात दाखल करू शकतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आरटीओ कार्यालयात एजंटची संख्या कमी आहे. दरम्यान, अनेकांना ऑनलाइन प्रक्रिया माहीत नसल्याने अनेकजण आजही एजंटचा आधार घेऊन लायसन्ससाठी अप्लाय करतात. परंतु, आता लायसन्स नोंदणी सुविधा ऑनलाइन झाली असल्याने आरटीओ कार्यालयात एजंट संख्या कमी आहे. परंतु, त्यांच्याशिवाय आरटीओमधील कामे होत नाहीत. अनेकांनाही अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया माहिती नसते. अशावेळी एजंटाशिवाय पर्याय नसतो. यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडून अधिकचा दर आकारला जातो. कोणत्या कामासाठी किती पैसे घेतले जावेत याचा काही ताळमेळ नसल्याने सर्वसामान्यांची लूट होत असल्याचे आरटीओ कार्यालयात आलेल्या लोकांचे म्हणणे आहे.

हातात कागदपत्रे घेऊन एजंट पुढे
बीड शहरानजीक असलेल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात प्रवेश केल्यास एजंट लोक कागदपत्रे घेऊन पुढे, तर वाहनांच्या कामानिमित्त आलेले नागरिक त्यांच्या मागे फिरत असल्याचे चित्र सर्रास पाहावयास मिळते. लायसन्स असो वा इतर कोणतेही काम असो, एजंटाशी संपर्क केल्याशिवाय कामे हाेत नाहीत.

काम लवकर होते
मला वेळ नसतो, लायसन्स काढायचे आहे. अनेकवेळा स्वत: ड्रायव्हिंगसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करीन असे ठरवले होते. परंतु, कामात व्यस्त असल्याने शेवटी एजंटाकडे कागदपत्रे देऊन काम करून घेत आहे. थोडेफार पैसे जातात, परंतु काम लवकर होते.
-संजय कोटुळे, व्यावसायिक बीड.

एजंटकडे कामे वेळेत होतात
मी शेती करतो, त्यामुळे लायसन्स किंवा इतर कामांसाठी कसा व कोठे अर्ज करायचा याची काहीच माहिती नाही. मुलाने एका एजंटाचा नंबर दिला होता. त्याचा शोध घेत आहे. एजंटकडे कागदपत्रे दिली की मोकळा होईल. एजंटकडे दिली की कामे वेळेत होतात.
-सखाराम काळे, शेतकरी, बीड.

अर्ज भरणे अवघड नाही
आरटीओमध्ये गेल्यानंतर कोणताही अर्ज भरणे अवघड नाही. परंतु, अनेकांना याची माहिती नसते. कधी प्रयत्न करत नसल्याने त्यांना कागदपत्रांची प्रक्रिया कशी करायची हे माहीत नसते. सर्वसामान्य नागरिकही स्वत: या ठिकाणी आपल्या कामासंदर्भाने अर्ज दाखल करू शकतो.
-धनंजय जाधव, शिक्षक, बीड.

सोपी प्रणाली आहे 
आरटीओमध्ये कोणत्याही कामासाठी एजंटची मदत घेण्याची गरज नाही. ऑनलाइन प्रणाली एकदम सोपी असून, सर्वसामान्य नागरिक आरटीओमध्ये जनसंपर्क अधिकाऱ्याची मदत घेऊ शकतात.
-स्वप्निल माने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, बीड.

Web Title: want driving license? An agent has to be applied in Beed RTO; He will go forward, you behind!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.