Walmik Karad ( Marathi News ) : पवन चक्की कंपनीकडे खंडणी मागितल्या प्रकरणी संशयित आरोपी वाल्मीक कराड याला २२ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर काल त्याच्याविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, याविरोधात परळीमध्ये कराड समर्थकांनी आंदोलन केले. आज वाल्मीक कराड याची पत्नी मंजिली कराड यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनावणे यांच्या सुद्धा काही गोष्टी मी बाहेर काढणार, असा इशारा दिला.
मोठी बातमी! संतोष देशमुख प्रकरणात न्यायालयीन समितीची स्थापना
मंजिली कराड म्हणाल्या,मी माझे आंदोलन सुरुच ठेवणार आहे. न्याय मागणारच आहे. संतोष देशमुख हा माझा बांधवच आहे, त्याच्या कुटूंबाला न्याय देण्यासाठी जरांगे पाटील जातात. माझ्या पतीसाठी मी न्याय मागत आहे. मला कोण न्याय देणार? माझ्या पतीला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, असा आरोप कराड यांनी केला.
"मराठा समाज म्हणून तुम्ही जरांगे यांच्याकडे न्याय मागताय. मी सुद्धा मराठा म्हणून जरांगे पाटलाकडे न्याय मागते. मराठा समाजाकडे आणि वंजारी समाजाकडे न्याय मागणार आहे. मी सुद्धा मराठा समाजाची आहे. मीडिया ट्रायल करुन स्टेप बाय स्टेप एक एक गोष्टी बाहेर काढल्या, पण आ.सुरेश धस, संदिप क्षीरसागर, अंजली दमानिया, बजरंग सोनवणे यांच्या सुद्धा काही गोष्टी मी बाहेर काढणार आणि त्या सुद्धा तुम्ही दाखवा, असा इशाराही मंजिली कराड यांनी दिला.
मंजिली कराड म्हणाल्या, आज बजरंग सोनवणे म्हणाले की परळीसारख्या मतदारसंघाला दोन मंत्री कसे. या पोटदुखीतूनच त्यांनी माझ्या पतीला अडकवण्याचा प्रयत्न केला. पिंपरी चिंचवड येथील प्लॅट जप्त केले वगैरे काही नाही. तेथील कर भरला नाही म्हणून नोटीस चिटकवली आहे. आम्ही तेथे राहत नाहीत. आम्ही तर ते पाहिले नाही. फ्लॅट घेणे काही बेकायदेशीर आहे का?, असा सवालही त्यांनी केला. काहीजणांनी हा जातीवाद लावला आहे. पण आपण सगळे सुज्ञ नागरिक आहोत. राजकीय लोकांचे कोणतेही म्हणणे मनावर न घेता सर्वांनी सामाजिक ऐकता जपायला हवी, असंही कराड म्हणाल्या.
"यापूर्वी अनेकजण अण्णांकडे मदत मागायला यायचे. पण ते आता विसरले. आता माझ्या पतीवर आरोप करणार्यांच्या सगळ्या भानगडी आम्ही समोर आणणार आहोत. आज धनंजय मुंडे यांची आणि माझी भेट झालेली नाही. भेटीची बातमी पूर्णपणे खोटी आहे, असंही मंजिली मुंडे सांगत धनंजय मुंडे यांनी भेट घेतल्याच्या बातम्यांना पूर्णविराम दिला.