राखेच्या प्रदूषणाविरुद्ध वडगावचे ग्रामस्थ एकवटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:33 IST2021-02-13T04:33:15+5:302021-02-13T04:33:15+5:30
१२ बीइडीपी २० राखेच्या प्रदूषणामुळे त्रस्त दादाहरी वडगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले/ १२ बीइडीपी २१ थर्मलचे ...

राखेच्या प्रदूषणाविरुद्ध वडगावचे ग्रामस्थ एकवटले
१२ बीइडीपी २० राखेच्या प्रदूषणामुळे त्रस्त दादाहरी वडगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले/ १२ बीइडीपी २१ थर्मलचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी आंदोलकांशी चर्चा केली.
दीड तास रास्ता रोको : परळी थर्मलच्या मुख्य अभियंत्यांनी दिले लेखी आश्वासन
परळी (जि. बीड) : येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या दादाहरी वडगाव व दाऊतपूर शिवारातील तळ्यामधील राख व राखसाठ्याच्या प्रदूषणामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. त्यामुळे प्रदूषण हटाव आणि दादाहरी वडगाव बचाव या मागणीसाठी ग्रामस्थांनी परळी - गंगाखेड राज्य रस्त्यावर शुक्रवारी सकाळी दीड तास रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे या मार्गावर दीड तास वाहतूक खोळंबली होती.
परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव, दाऊतपूर शिवारात थर्मलचे राख तळे असून, या तळ्यातून दररोज शेकडो टिप्पर भरून राखेची वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक परळी-गंगाखेड रस्त्यावरील दुचाकीसह सर्वच वाहन चालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. विशेष म्हणजे दादाहरी वडगाव येथील साडेतीन हजार ग्रामस्थांना राखेच्या प्रदूषणाचा अनेक वर्षांपासून त्रास होत आहे. डोळ्यांचे व फुफ्फुसाचे आजार होत आहेत. गेल्या पाच वर्षांत श्वसनाचे गंभीर आजार जडलेले रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे राख तळ्यातून होणारी राखेची वाहतूक बंद करावी व दा. वडगाव, दाऊतपूर शिवारात राख साठे उद्ध्वस्त करावेत व प्रदूषण मुक्त गाव करावे या मागणीसाठी शुक्रवारी परळी -गंगाखेड रस्त्यावरील दादाहरी वडगाव जवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात वडगाव येथील आबालवृद्ध मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राखेचे प्रदूषण हटवा व ग्रामस्थांना वाचवा अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात केला होता. परळी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, पोलीस निरीक्षक शिवलाल पुर्भे यांनी आंदोलकांची भेट घेतली. मुख्य अभियंत्यांनी लेखी स्वरूपात आश्वासन दिले. वडगाव परिसरात राखेचे साठे करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल व राख वाहतुकीमुळे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेतली जाईल असे लेखी पत्र दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले .