ग्रामस्थांनी एचआयव्हीबाधित मुलाचे अंत्यसंस्कार नाकारले, बीडमधील संतापजनक घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 07:06 IST2019-08-12T07:05:55+5:302019-08-12T07:06:17+5:30
आईला एचआयव्ही आजार. याच आजाराने त्यांचा १२ वर्षीय मुलगा मरण पावला. मात्र, समाजातील लोकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने, शेवटी आईनेच समाजसेवी संस्थेच्या मदतीने मुलावर अंत्यसंस्कार केले.

ग्रामस्थांनी एचआयव्हीबाधित मुलाचे अंत्यसंस्कार नाकारले, बीडमधील संतापजनक घटना
- सोमनाथ खताळ
बीड : आईला एचआयव्ही आजार. याच आजाराने त्यांचा १२ वर्षीय मुलगा मरण पावला. मात्र, समाजातील लोकांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याने, शेवटी आईनेच समाजसेवी संस्थेच्या मदतीने मुलावर अंत्यसंस्कार केले.
मनिषा (वय ४२, नाव बदललेले) यांचा वयाच्या पंचविसाव्या वर्षी मुकादमासोबत विवाह झाला. काही दिवसांनी मनिषाला पतीने सोडले. त्यानंतर, मनिषा घराबाहेर पडून हॉटेल व इतर ठिकाणी राहून काम करू लागली. यातूनच ती गर्भवती राहिली. तिला मनोज व मोनिका (नाव बदलेली) अशी दोन मुले झाली. या दोन्ही मुलांना एचआयव्ही होता. दहा वर्षांपूर्वी मोनिकाचा मृत्यू झाला. मागील १५ दिवसांपूर्वी मनोजची प्रकृती खालावली. त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी पहाटेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.
पोटच्या गोळ्याचा मृतदेह डोळ्यासमोर ठेवून मनिषा गल्लीतील लोकांना अंत्यसंस्कारासाठी विनवणी करीत होती. मात्र, समाजाने मदत करण्याऐवजी नावेच ठेवली. कोणीच पुढे येत नसल्याने मनिषा खचली होती. काय करावे समजत नव्हते. अखेर दु:ख पचवून मनिषाने रिक्षा केला आणि त्यात मृतदेह घेऊन थेट पाली येथील ‘इन्फंट इंडिया’ही समाजसेवी संस्था गाठली. इन्फंटच्या ‘वेदना’ स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मृतदेह घेऊन महिला
आमच्याकडे येताच सर्व कारवाई करून दफनविधी करण्यात आला. आता या आईलाही आम्ही आधार देत आहोत. सध्या इन्फंटमध्ये ६९ मुले, मुले आणि ८ महिला आहेत. या सर्वांचा सांभाळ कुटुंबातील सदस्यांप्रमाणे करत आहोत. समाजाने मानसिकता बदलून यांना आधार देण्याची गरज आहे.
- दत्ता बारगजे, संचालक इन्फंट इंडिया, पाली, जि. बीड.