Beed Walmik Karad:बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून मागील महिनाभरापासून जिल्ह्यासह राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. या हत्या प्रकरणातील सात आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. तसंच पवनचक्की खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याचा सरपंच हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचा आरोप करत कराड याला हत्येच्या गुन्ह्यात सहआरोपी करावं, अशी मागणी होत आहे. या मागणीसाठी काल दिवंगत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी मस्साजोग इथं आंदोलन केलं. त्यानंतर आता वाल्मीक कराड याच्या बाजूनेही आंदोलने सुरू झाली असून वाल्मीक कराड याच्या आईने परळी शहर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
"राजकीय सूडबुद्धीतून माझ्या मुलावर कारवाई केली जात आहे," असा आरोप वाल्मीक कराडच्या आईसह इतर आंदोलकांनी केला आहे. आम्हाला न्याय हवा आहे, असं म्हणत या आंदोलकांकडून पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजीही करण्यात आली.
दरम्यान, एकीकडून पीडित देशमुख कुटुंबाचा टाहो आणि दुसरीकडे खंडणीतील आरोपी वाल्मीक कराडच्या समर्थनात होणाऱ्या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची अडचण झाल्याचं दिसत आहे.
...तर ग्रामस्थ करणार आत्मदहन
सोमवारी देशमुख कुटुंबाचं आंदोलन सोडवताना सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी, एसआयटीचे प्रमुख उपमहानिरीक्षक बसवराज तेली यांच्यासोबत भेट घालून देण्याची मागणी मान्य केल्यानंतर धनंजय व वैभवी देशमुख यांच्यासह आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले; परंतु मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत जर भेट झाली नाही आणि तपासाची अपडेट दिली नाही, तर मस्साजोग ग्रामस्थांनी थेट सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला.