वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टची चौकशी प्रलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:58 IST2021-03-13T04:58:09+5:302021-03-13T04:58:09+5:30
बीड : वैद्यनाथ देवस्थानच्या मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली ...

वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टची चौकशी प्रलंबित
बीड : वैद्यनाथ देवस्थानच्या मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केली होती. त्यानुसार विधी व न्याय विभागामार्फत धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्याकडून धर्मादाय सहआयुक्त बीड यांना २३ डिसेंबर २०२० रोजी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, अद्याप कुठल्याही प्रकारची चौकशी न केल्याचा आरोप मुंडे यांनी केला आहे.
शासनाकडून विधी व न्याय विभागामार्फत धर्मादाय आयुक्त मुंबई यांच्याकडून धर्मादाय सहआयुक्त बीड यांना चौकशीचे आदेश देण्यात आले होते. मात्र, अद्याप चौकशी करण्यात आलेली नाही. यासंदर्भात वसंत मुंडे यांनी पुन्हा एकदा चौकशी करून वैजनाथ देवस्थान ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, लॉकडाऊन काळात राज्यातील सर्व मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, वैद्यनाथ मंदिरात ठरावीक ‘व्हीआयपी’ लोकांना दर्शन घेण्यासाठी पूजा व अभिषेक करण्यासाठी खास बाब म्हणून परवानगी देण्यात आली होती. तसे ‘सीसीटीव्ही’ फुटेजमध्ये सर्व निदर्शनास येऊन चौकशीअंती बाहेर येईल. लॉकडाऊनच्या काळात शासनाने सर्वधर्मीय देवस्थाने बंद ठेवण्याचे आदेश दिले होेते. सर्वांना नियम सारखेच असतानादेखील परळीच्या वैद्यनाथ मंदिर ट्रस्टने स्वतःच्या स्वार्थासाठी मंदिराचा गैरवापर करून ‘व्हीआयपीं’ना दर्शन लॉकडाऊनमध्ये सुरू ठेवले होते; परंतु लॉकडाऊन काळात सर्वसामान्य शिवभक्त मंदिराच्या पायरीचे व कळसाचे दर्शन घेण्यासाठी येत होते. त्यांना ट्रस्टच्या मार्फत सुरक्षा रक्षकाकडून शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होती. याची देखील गांभीर्याने देखल घेऊन सखोल चौकशी करून मंदिर ट्रस्ट बरखास्त करण्याची मागणी मुंडे यांनी केली आहे.