ट्रकच्या धडकेत दुचाकीचा झाला चुराडा; ऐन दसऱ्याच्या दिवशी दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 13:08 IST2021-10-16T13:07:40+5:302021-10-16T13:08:32+5:30
वाघळूज घाटात ट्रक- दुचाकीची वळणावर समोरासमोर धडक झाली

ट्रकच्या धडकेत दुचाकीचा झाला चुराडा; ऐन दसऱ्याच्या दिवशी दुचाकीस्वार तरुण जागीच ठार
कडा ( बीड ) : वाघळुज घाटात ट्रक- दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाला. मकरंद भालेकर ( ३०, रा. शेरी बुद्रुक ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील शेरी बुद्रुक येथील युवक मकरंद भालेकर हा शुक्रवारी दुपारच्या सुमारास कड्यावरून नगरकडे दुचाकीवर चालला होता. दरम्यान, अहमदनगरवरून जामखेडकडे एक ट्रक ( MH 16 AY 8586 ) येत होता. दोन्ही वाहनांची वाघळूज घाटातील वळणावर समोरासमोर धडक झाली. यात दुचाकीवरील मकरंद याचा जागीच मृत्यू झाला. धडक एवढी जोरात होती की यात दुचाकीचा चुराडा झाला आहे. ऐन दसरा सणाच्या दिवशी तरुणाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.