वरपगाव येथे दोन गटात हाणामारी; दहा गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 16:53 IST2018-03-13T15:31:07+5:302018-03-13T16:53:50+5:30
विहिरीच्या मस्टरवर सही करण्यावरून सरपंच आणि विरोधी गटात झालेल्या हाणमारीत १० जण गंभीर जखमी झाले आहेत.

वरपगाव येथे दोन गटात हाणामारी; दहा गंभीर जखमी
अंबाजोगाई ( बीड ) : तालुक्यातील वरपगाव गावात विहिरीच्या मस्टरवर सही करण्यावरून सरपंच आणि विरोधी गटात झालेल्या हाणमारीत १० जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरपगाव येथील दोन गटात मागील वर्षभरापासून सातत्याने धुसफूस सुरू आहे. आज सकाळी काही ग्रामस्थ ९ वाजताच्या सुमारास सरपंचाच्या घरी विहिरीच्या मस्टरवर सही मागण्यासाठी गेले होते. यावेळी शाब्दीक बाचाबाचीस सुरूवात होऊन त्याचे पर्यावसन दोन्ही गटातील तुंबळ हाणामारीत झाले. यावेळी भांडणात लोखंडी गज, काठ्या, दगडांचा वापर करण्यात आला. या हाणामारीत ग्रामपंचायत सदस्य तानबा बाबुराव लांडगे, ग्रामरोजगार सेवक दिगांबर बालासाहेब पवार, संजय काशिनाथ काळे, बालाजी सुदाम माळी, लक्ष्मण हनुमंत भगत आणि सचिन सुभाष पवार तर सरपंच गटाचे स्वत: सरपंच अंकुश पांडुरंग शिंदे, खंडू पांडुरंग शिंदे, बंडु दगडू शिंदे आणि शिवराज बंडु शिंदे हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू असून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस सर्व परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.