बीड : दीनदयाल शोध संस्थान, जनशिक्षण संस्थान बीड, कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकारद्वारा जनशिक्षण संस्थानच्या प्रशिक्षकांच्या कौशल्य विकासासाठी अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी प्रबंध समिती सदस्य डॉ. मधुरा कुलकर्णी, जनशिक्षण संस्थांचे संचालक गंगाधर देशमुख, सिद्धी सार्थक गोशाळेच्या प्रमुख उमा औटी, अगरबत्ती उद्योजक शीतल तावरे यांची उपस्थिती होती.उपस्थित प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना मधुरा कुलकर्णी यांनी नावीन्यपूर्ण खेळ व विविध उदाहरणाच्या माध्यमातून क्षमता व कौशल्य विकसन, आपणास मिळालेली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडणे, आपल्याकडील कौशल्याचा प्रामाणिक उपयोग करणे इत्यादीबाबत मार्गदर्शन केले. शीतल तावरे यांनी त्यांच्या उद्योगात पदार्पण करण्यासाठी आलेले अनुभव सांगताना त्या म्हणाल्या की, कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी लौकिक शिक्षण आड येत नाही. उद्योजकीय ज्ञान मात्र आवश्यक आहे. उमा औटी यांनी गोमय अगरबत्ती कशी तयार करायची प्रात्यक्षिकासह सांगितले. तसेच गाईपासून मिळणाऱ्या प्रत्येक घटक उदाहरणार्थ गोमय, गोमूत्र, गोझरण, दूध इ. खूप मौलिक असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर प्रत्यक्ष धूप अगरबत्ती तयार करण्याचे प्रशिक्षण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक गंगाधर देशमुख यांनी केले. गोकुळ समितीचे सदस्य रवींद्र देशमुख, उद्योजक विजयकुमार गर्जे यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यक्रम अधिकारी सीमा मणुरकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जनशिक्षण संस्थांच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.