BJP Suresh Dhas : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सुरू असलेलं राजकीय वादंग थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाटोदा तालुक्यातील समर्थकांनी काल भाजप आमदार सुरेश धस यांच्याविरोधात आंदोलन केल्यानंतर आज आमदार धस यांनी पलटवार केला. "धनंजय मुंडे यांच्या एका समर्थकाने काल माझ्यावर टीका करताना सांगितलं की, सुरेश धस आमच्या मतांवर आमदार झाले आहेत. पण हे खोटं आहे. पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी आमच्या मतदारसंघात विधानसभा निवडणुकीत भीमराव धोंडे यांना मतदान केलं आहे. मला मतदान केल्याचा दावा करणाऱ्या कार्यकर्त्याने धनंजय मुंडेंना घेऊन यावं आणि भगवान बाबांच्या समाधीला हात लावून सांगावं की कोणाला मतदान केलंय," असं आव्हान सुरेश धस यांनी दिलं आहे.
"मी लोकसभा निवडणुकीत प्रामाणिकपणे पंकजा मुंडे यांचं काम केलं होतं. पण विधानसभा निवडणुकीत त्यांनी माझ्याविरोधात उभ्या असलेल्या भीमराव धोंडेंची मदत केली. धनंजय मुंडे यांनीही त्यांच्या पक्षाचा उमेदवार उभा असताना त्याला मदत न करता धोंडे यांना मदत केली," असा आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
पाटोद्यात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी पाटोदा पोलिस ठाण्यात आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे समर्थक एकापाठोपाठ एकवटले. दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली. दोन्हीही समर्थक आमने-सामने जरी आले नाही तरी घोषणाबाजीमुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दाखल फिर्यादीनुसार अदखलपात्र गुन्हे नोंद करण्यात आले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळावा या मागणीसाठी विधानसभेत आणि राज्यात विविध ठिकाणी निषेध मोर्चाच्या माध्यमातून या घटनेला आमदार सुरेश धस वाचा फोडत आहेत. तसेच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे धस व जरांगे यांच्याबाबत सोशल मीडियात आक्षेपार्ह मजकूर टाकून बदनामी चालवली आहे. बदनामी करणाऱ्या समाज कंटकांवर गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी तालुक्यातील आ. धस समर्थकांनी पाटोदा ठाण्यात ठिय्या देत आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर नगरपंचायतचे माजी सभापती राजू जाधव यांच्या तक्रारीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, दोन्ही गट पोलrस ठाण्यात आल्याने तणाव निर्माण होईल अशी शक्यता होती. परंतु दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत कारवाइचे आश्वासन दिले. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, म्हणून तातडीने बंदोबस्त वाढविला. गुन्हे दाखल झाल्यानंतर हा सर्व जमाव माघारी परतला.