ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यावर उपासमारीची वेळ; देखरेख करणारे मानधनापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:16+5:302021-07-02T04:23:16+5:30
घरकुल लाभार्थ्यांच्या बांधकामावर देखरेख ठेवणारे ग्रामीण गृहनिर्माण अभियंते सर्वत्र कार्यरत आहेत. या अभियंत्यांची नियुक्ती एनजीओ संस्थेमार्फत करण्यात आली आहे. ...

ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यावर उपासमारीची वेळ; देखरेख करणारे मानधनापासून वंचित
घरकुल लाभार्थ्यांच्या बांधकामावर देखरेख ठेवणारे ग्रामीण गृहनिर्माण अभियंते सर्वत्र कार्यरत आहेत. या अभियंत्यांची नियुक्ती एनजीओ संस्थेमार्फत करण्यात आली आहे. त्यांना घरकुल बांधकामावर मेहनताना दिला जात असल्याचे सांगण्यात येते.
घरकुलासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यास घरकुलाच्या आवश्यक दस्तऐवजासह फाइल, लेआउट, टप्प्याटप्प्यांनी काढण्यात येणारे बांधकामाची देयके, बांधकाम सुरू असताना वेळोवेळी दिली जाणारी गृहभेट, एकंदरीत घरकुल बांधकामावर ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याचे संपूर्ण नियंत्रण असते. एका घरकुलाचा मेहनताना बांधकाम, सज्जापर्यंत पूर्ण छत, शौचालयासह घरकुलाचे पूर्ण बांधकाम झाल्यावर, अशा ४ टप्प्यांत मिळणे आवश्यक आहे. नोव्हेंबर २०१९ पासून ते आतापर्यंत ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना मानधन मिळाले नसल्याची ओरड आहे. गावखेड्यातील लाभार्थ्यांचे टुमदार घरकुलाचे स्वप्न पूर्ण करणारे, वेळोवेळी गृहभेट देऊन बांधकामाचे निरीक्षण करून लाभार्थ्यांना बांधकामासंबंधी मार्गदर्शन करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांना गृहभेटीचा प्रवास भत्ता मिळत नसल्याची माहिती आहे. मागील दीड वर्षापासून मानधन मिळाले नसल्याने संबंधित गृहनिर्माण अभियंत्यांवर उपासमारीची पाळी आली आहे.
------
जिल्ह्यात ११० अभियंते
सद्य:स्थितीत अंबाजोगाई पंचायत समितीमध्ये १० प्रमाणे जिल्ह्यात ११० ग्रामीण गृहनिर्माण अभियंते बाह्य खाजगी यंत्रणेकडून कार्यरत आहेत. त्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या घरकुलांचे स्वप्न पूर्ण केले जाते.
------