‘आयपीएल’वर सट्टा घेणारे तिघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:10 IST2019-05-06T00:08:51+5:302019-05-06T00:10:31+5:30
आॅपरेशन आॅलआउट दरम्यान नाकाबंदी करताना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या पथकाने आयपीएलच्या सामन्यासाठी सट्टा घेणाऱ्या तीन सट्टेबाजांना ताब्यात घेतले.

‘आयपीएल’वर सट्टा घेणारे तिघे जेरबंद
अंबाजोगाई : आॅपरेशन आॅलआउट दरम्यान नाकाबंदी करताना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या पथकाने आयपीएलच्या सामन्यासाठी सट्टा घेणाऱ्या तीन सट्टेबाजांना ताब्यात घेतले. तिघांवरही गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून मोबाईल, दुचाकीसह ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
शनिवारी मध्यरात्री आॅपरेशन आॅलआउट दरम्यान अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भुजबळ, सहा. फौजदार बिडगर, पो.ना. येलमाटे, कुंडगीर हे नाकाबंदी करत होते. यावेळी दुचाकीवरून (एमएच ४४ एम ९३७७) प्रमोद सिद्रामअप्पा पोखरकर, श्रीनिवास बाळासाहेब पंडित आणि गजानन गुलाबराव यादव हे तिघे तरुण संशयास्पद अवस्थेत बसस्थानकाकडून भगवानबाबा चौकात येत असलेले त्यांना दिसून आले. पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली असता डिक्कीमध्ये वही आढळून आली. त्यात आकडे, पैसे आणि आयपीएल सामन्याबाबत माहिती होती. पोलिसांनी चौकशी केली असता शनिवारी झालेल्या आयपीएल सामन्यात कोणता खेळाडू किती धावा काढणार, किती बळी घेणार यावर घेतलेल्या सट्ट्याचा हिशोब असल्याचे सांगितले. पोलिसांनी मोबाईल, रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण ७५ हजार ५०० मुद्देमाल जप्त केला. पोलीस कर्मचारी कुंडगीर यांच्या फिर्यादीवरून तिन्ही तरुणांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.