परळीत विक्रीसाठी आणलेली तीन गावठी पिस्तुल, ७ काडतूस जप्त; दोन युवक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2022 18:45 IST2022-02-22T18:44:49+5:302022-02-22T18:45:35+5:30
चांदापुर रस्त्यावर पोलिसांनी केली कारवाई

परळीत विक्रीसाठी आणलेली तीन गावठी पिस्तुल, ७ काडतूस जप्त; दोन युवक ताब्यात
परळी( बीड) : शहरातील चांदापूर रस्त्यावर आज दुपारी पोलीस कारवाईत दोघांकडून ३ गावठी पिस्तुले व ७ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. पोलिसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.
याबाबतची पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,येथील चांदापुर रस्त्यावर दोघे जण गावठी पिस्तूल घेऊन थांबले असल्याची माहिती अंबाजोगाईचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील जायभाये यांना मिळाली. त्यांनी तत्काळ परळी शहर पोलीस ठाण्यास सूचना केली. यावरून जमादार भास्कर केंद्रे यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
यावेळी संशियत दोघांची झडती घेतली असता एका जवळील बॅगेत दोन गावठी पिस्तुल व सात काडतुसे तर दुसऱ्या जवळ एक गावठी पिस्तुल आढळून आले. मनोज भरत गीते ( हाळम तालुका परळी) व नागनाथ देवनाथ फड ( रा. ऊखळी तालुका गंगाखेड ) अशी आरोपींची नावे आहेत.
दरम्यान, परळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भार्गव सपकाळ ,पोलिस जमादार भास्कर केंद्रे , तुकाराम मुरकुटे गोविंद भताने ,श्रीकांत राठोड ,गोरे ,राजकुमार मुंडे याच्या कारवाईत गेल्या काही दिवसात सहा गावठी पिस्तूल जप्त करण्यात अली आहेत.