लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही एका डॉक्टरसह तिघे कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 17:51 IST2021-03-15T17:48:41+5:302021-03-15T17:51:27+5:30
Corona virus लस घेतली तरी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे, हे स्पष्ट होते.

लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही एका डॉक्टरसह तिघे कोरोनाबाधित
बीड : कोरोनाची लस घेतल्यानंतरही एका डॉक्टरसह परिचारीका, आरेग्य कर्मचारी असे तिघे जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यावरून लस घेतली तरी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे, हे स्पष्ट होते. लस घेतल्यावर कोरोना होत नाही, हा मनातील गैरसमज काढून काळजी घेणे आवश्यक आहे.
जिल्ह्यात १६ जानेवारीपासून कोरोना लसीकरणास सुरूवात झाली. पहिल्या काही दिवसांत जिल्हा राज्यात अव्वल राहिला. परंतु नंतर सर्वांनीच आखडता हात घेतला आणि जिल्ह्यातील लसीकरणाची घसरण झाली. पहिल्या टप्यात आरोग्यकर्मी, दुसऱ्या फ्रंटलाईन वर्कर्स आणि तिसऱ्या टप्यात ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याचे नियोजन झाले. लस घेतल्यावर कोरोनाचा संसर्ग होत नाही, असा सर्वांच्या मनात गैरसमज होता. लस घेतल्यावरही काळजी घ्यावी, असे आवाहन वारंवार करण्यात आले, परंतु अनेकांनी काळजी घेतली नाही.
दरम्यान, जिल्ह्यातील डॉक्टर संघटनेच्या एका पदाधिकाऱ्याने इतरांना लस घेण्याचे आवाहन करण्यासह स्वता: पुढे होऊन लस घेतली. पहिला डोस पहिल्याच दिवशी म्हणजेच १६ जानेवारी आणि दुसरा डोस १६ फेब्रुवारीला घेतला. परंतु रविवारी थोडा ताप आल्याने त्यांनी कोरोना चाचणी केली. यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या डॉक्टरसह जिल्हा रूग्णालयातील परिचारीका आणि एक आरोग्य कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. लस घेतली तरी नागरिकांनी काळजी घ्यावी. कोरोना नियमांचे पालन करावे, असे आवाहनही बाधित आलेल्या डॉक्टरने केले आहे.