जिल्हा रुग्णालयातील हजारो रुग्णांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST2021-01-10T04:26:09+5:302021-01-10T04:26:09+5:30
बीड : रुग्णालय उभारताना आणि उभारल्यानंतर अग्निशमन विभागाची एनओसी घेणे बंधनकारक असते. परंतु, बीडमधील केवळ एक ते दोन खासगी ...

जिल्हा रुग्णालयातील हजारो रुग्णांचा जीव धोक्यात
बीड : रुग्णालय उभारताना आणि उभारल्यानंतर अग्निशमन विभागाची एनओसी घेणे बंधनकारक असते. परंतु, बीडमधील केवळ एक ते दोन खासगी डॉक्टरांनीच ही एनओसी घेतलेली आहे. विशेष म्हणजे, जिल्हा रुग्णालयानेही एनओसी घेतलेली नाही. गतवर्षी रेकॉर्ड रुमला आग लागल्यानंतरही रुग्णालय प्रशासनाने एनओसी घेतली नाही. त्यामुळे येथे उपचार घेणाऱ्या शेकडो रुग्णांचा जीव धोक्यात असल्याचे दिसते.
भंडारा येथे एनसीयू विभागाला लागेल्या आगीत १० बालकांचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. मन सुन्न करणाऱ्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण देश हळहळला. हाच धागा पकडून शहरातील खासगी व शासकीय रुग्णालयांची शनिवारी अग्निशमन विभागाकडून माहिती घेतली. यात नियमाप्रमाणे रुग्णालय उभारण्यापूर्वी व पूर्ण झाल्यावर अंतिम एनओसी घेणे बंधनकारक असते. परंतु, असे कोणीच करीत नसल्याचे दिसते. एक ते दोघांनीच ही एनओसी घेतल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे, यात शासकीय जिल्हा रुग्णालयाचाही समावेश आहे. गतवर्षी प्रशासकीय इमारतीतील रेकॉर्ड रूमला लागलेल्या आगीत साहित्य खाक झाले होते. सुदैवाने रुग्ण असलेल्या इमारतीत आग लागली नव्हती. एवढी गंभीर घटना घडल्यानंतर अग्निशमन विभागाने तपासणी केली असता त्यांच्याकडे एनओसी नसल्याचे उघड झाले. सर्व नियमाप्रमाणे तपासून घेण्यास सांगितल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने काहीच केले नाही. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
बीडच्या एसएनसीयूत २२ बालके
जिल्हा रुग्णालयातील एनसीयू विभाग कोरोनामुळे काकू-नाना हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आला आहे. येथे १६ वॉर्मर असून २२ बालके उपचार घेत आहेत. दोन डॉक्टर, दोन परिचारिका, दोन कक्ष सेवक येथे २४ तास कर्तव्यावर असतात. सध्या तरी येथील विभाग सुरक्षित आहे. विभाग प्रमुख डॉ.इलियास खान यांनी शनिवारी सर्व आढावा घेतला.
ना प्रशिक्षण, ना गांभीर्य
अपवादात्मक वगळले तर बहुतांश खाजगी रूग्णालयात अग्निरोधक यंत्रच नाहीत. ज्या ठिकाणी आहेत तेथील लोकांना या यंत्राचा वापर कसा करतात, याची माहिती नाही. असे असतानाही रुग्णालय प्रशासनाला कसलेच गांभीर्य नाही. भंडारासारखी दुर्दैवी घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यास कोणीही पुढे येत नाही, हे विशेष आहे.
काय म्हणतेय फायर ब्रिगेड....
याबाबत बीड अग्निशन विभागाचे प्रमुख बी.ए.धायतडक म्हणाले, काम सूरू करण्यापूर्वी व पूर्ण झाल्यावर अशा दोन एनओसी घेणे बंधनकारक असते. बीडमध्ये केवळ एक ते दोन लोकांनी एनओसी घेतली आहे. जिल्हा रुग्णालयाकडेही एनओसी नाही. गतवर्षी आग लागल्यानंतर त्यांना सूचना करूनही अद्याप एनओसी घेतली नाही. तक्रार नसल्याने आणि एनओसी नसल्याने अचानक तपासणी करता येत नाही.
कोट
मी थाेडं कामात आहे. एक तासानंतर फोन करतो.
डॉ.सूर्यकांत गित्ते
जिल्हा शल्य चिकित्सक, बीड