पस्तीस हजार पशुधनाच्या लसीकरणाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:22 IST2021-07-21T04:22:58+5:302021-07-21T04:22:58+5:30
शिरूर कासार : तालुक्यात शिरूरसह एकूण पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत जनावरांना फऱ्या व घटसर्प रोगांच्या संसर्गापासून संरक्षण मिळावे ...

पस्तीस हजार पशुधनाच्या लसीकरणाचे काम सुरू
शिरूर कासार : तालुक्यात शिरूरसह एकूण पाच पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत जनावरांना फऱ्या व घटसर्प रोगांच्या संसर्गापासून संरक्षण मिळावे यासाठी लस देण्याची मोहीम पशुवैद्यकीय विभागाने हाती घेतली आहे. पस्तीस हजार पशुधनाचे लसीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी दिली.
पाऊस सुरू झाला की साधारणपणे गाय, म्हैस, बैल आदी जनावरांना फऱ्या व घटसर्प याची लागण होते. जनावरांसाठी घातक ठरून शेतकऱ्यांचेदेखील नुकसान होते. त्याचबरोबर कामाचादेखील खोळंबा होतो. या सर्व बाबी टाळण्यासाठी पशुधन विभागाकडून लसीकरणाची मोहीम हाती घेऊन तिचे कामदेखील शिरूरसह पाच उपकेंद्रांतर्गत सुरू झालेले आहे.
तालुक्यात एकूण आठ दवाखाने असले तरी घाटशिळ पारगाव व ब्रह्मनाथ वेळंब या ठिकाणी जागा रिक्त आहेत. शिरूर येथे डॉ. प्रदीप आघाव व त्यांचे सहकारी, रायमोह येथे डॉ. अंजली बोरघरे व उद्धव खेडकर, खालापुरी येथे डॉ. अनिरुद्ध सावंत, पिंपळनेरला डॉ. सर्जेराव आंधळे, मानूरला सोपान राठोड व जाटनांदूर येथे डॉ. सुदर्शन गीते यांच्या सहकार्याने लसीकरणाची मोहीम राबविण्यात येत असल्याचे सांगितले गेले.
तालुक्यात गाय, म्हैस, बैल यांची संख्या ३५,००० इतकी असून या सर्व जनावरांना लस दिली जाणार आहे. फऱ्या आणि घटसर्प हा आजार जनावरांसाठी घातक ठरू शकतो. त्यासाठी आपले पशुधन सुरक्षित ठेवण्यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेण्याचे आवाहन डॉ. प्रदीप आघाव यांनी केले आहे.
विशेषत्वाने या गोष्टीचीही काळजी घ्या
सध्या पाऊस सुरू असून हिरवा चारा भरपूर प्रमाणात उपलब्ध असला तरी या कोवळ्या चाऱ्यामुळे जनावरे ढेंडाळणे तसेच पोटफुगीची भीती असते त्यासाठी पशुपालकांनी कोवळ्या हिरव्या चाऱ्यासोबत वाळलेला कडबा, सरमाड असा सुका चारा खाऊ घालणे जरूरी आहे.
त्याचबरोबर जनावरांना गढूळ पाणी, ओढे, नाले व साचलेल्या डबक्यातील पाणी पाजणे टाळावे, अन्यथा काविळीची बाधा जडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपली जनावरे ही तलावाभोवती, नदीकाठी चारण्याचा मोह धरू नये, परिणामी पशुधनाच्या आरोग्याला बाधा निर्माण होण्याचा धोका नाकारता येणार नाही. त्यासाठी हे टाळणे हिताचे ठरणार आहे, असे सांगण्यात आले.
सध्या पावसामुळे शेतात वापसा मोड असून शेतकरी व त्यांचे बैल रिकामेच आहेत. अशा वेळी शेतकऱ्यांनी लसीकरण लवकर करून घ्यावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रदीप आघाव यांनी केले आहे.
200721\img-20210714-wa0064.jpg
लसिकरण करतांना डॉ प्रदिप आघाव