बीडमध्ये वॉटरकप स्पर्धकांचा उत्साह आणखी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 00:10 IST2018-05-14T00:10:52+5:302018-05-14T00:10:52+5:30
वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सहभागी असलेल्या गावांना इंधनासाठी प्रशासनाकडून दीड लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या स्पर्धक गावांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.

बीडमध्ये वॉटरकप स्पर्धकांचा उत्साह आणखी वाढणार
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील सहभागी असलेल्या गावांना इंधनासाठी प्रशासनाकडून दीड लाख रूपयांचा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे सहभागी झालेल्या स्पर्धक गावांचा उत्साह शिगेला पोहचला आहे.
दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. आमिर खान यांच्या संकल्पनेतून राज्यात वॉटरकप स्पर्धा राबवली जात आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांना बक्षीस देखील दिले जाते. आपला शिवार पाणीदार करण्यासाठी मोठ्या संख्येने गावकरी वॉटर कप स्पर्धेतील श्रमदानात सहभागी झाले आहेत. जिल्ह्यात अनेक गावांनी या स्पर्धेच्या माध्यमातून परिवर्तनाची वाट धरली. श्रमदानानंतर यंत्राने कामे करावी लागणार आहेत. या यंत्रांसाठी लागणाऱ्या इंधनाच्या खर्चाचा विषय होता. जैन संघटना तसेच इतर सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी इंधनासाठी आर्थिक मदत केली. आता या कामांना गती मिळण्यासाठी प्रशासन देखील सरसावले आहे.
राज्य शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा झाल्यानंतर वॉटर कप स्पर्धेतील गावांना यंत्रकामासाठी इंधन खर्च पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक सहभागी गावाला दीड लाख रुपये मिळणार आहेत. हा निधी तातडीने दिल्यास स्पर्धेतील गावांचा वेळ वाया जाणार नाही. प्रशासनाने या दृष्टीने तातडीने निधी वितरणासाठीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी मागणी होत आहे.
तीन कोटींची तरतूद
जिल्ह्यात उन्हाळ््यात देखील फक्त ८ ते १० टँकर सुरू आहेत. जिल्ह्यात २९० गावांमध्ये वॉटरकप स्पर्धेत सहभागी झाले आहे. त्यापैकी १०३ गावांनी मृदा व जलसंधारणासाठी प्रत्यक्ष श्रमदान केले आहे. या गावांना प्रोत्साहन मिळण्यासाठी मशीनद्वारे केल्या जाणाºया कामांना लागणारे इंधन खर्चासाठी प्रत्येकी १.५० लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे. वॉटरकप स्पर्धेतील केज, अंबाजोगाई, परळी, धारूर, आष्टी या तालुक्यातील धरणातील गाळ काढण्यासठी देखील निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने ३ कोटी रूपये निधीची तरतूद केली आहे. आता या वॉटरकपच्या कामांना आणखी गती मिळणार असून, सहभागी गावातील स्पर्धकांचा उत्साह वाढणार आहे. या झालेल्या कामांमुळे जिल्हा पाणीदार होण्यास मदत होणार आहे.