पाणी पुरवठा होत नाही; नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:31 IST2021-02-12T04:31:27+5:302021-02-12T04:31:27+5:30
धारूर शहरातील झारेगल्ली भागात मागील दहा वर्षांपासून पंचवीस ते तीस घरांना पाणी पुरवठा होत नाही. पाण्यापासून त्यांना अलिप्त राहावे ...

पाणी पुरवठा होत नाही; नगरसेवकाचा उपोषणाचा इशारा
धारूर शहरातील झारेगल्ली भागात मागील दहा वर्षांपासून पंचवीस ते तीस घरांना पाणी पुरवठा होत नाही. पाण्यापासून त्यांना अलिप्त राहावे लागत आहे. या ठिकाणी नवीन ठिकाणांकडे पुरवठा जोडणी करणे गरजेचे आहे. नगरसेवक संजित कोमटवार यांनी धारूर नगरपालिकेला याबाबत वारंवार अर्ज केले. जिल्हाधिकारी यांनी नगरपालिकेला पत्र देऊन त्या भागातील नागरिकांच्या पाण्याची व्यवस्था कसा करा, असे आदेश दिले होते. परंतु अजूनही त्या आदेशाची अंमलबजावणी झालेली दिसून येत नाही.
याबाबत धारूर नगरपालिकेला दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादीचे नगरसेवक संगीत कोमटवार यांनी म्हटले आहे की, नगरपालिका हद्दीतील प्रभाग तीन येथील झारे गल्ली भागातील दहा वर्षांपासून पंचवीस ते तीस घरे पाण्यापासून अजूनही अलिप्त राहात आहेत. त्याकरिता नवीन ठिकाणांहून कनेक्शन करण्यात यावे, यासाठी अर्ज विनंती केली होती. जिल्हाधिकारी यांनी अर्जाची दखल घेतली. २२ जून २०१८ रोजी मुख्याधिकाऱ्यांना पत्रव्यवहार करून नगर परिषद हद्दीतील झारे गल्ली भागातील पंचवीस ते तीस घरे पाण्यापासून अलिप्त राहात आहेत, त्यांना नवीन ठिकाणांहून कनेक्शन जोडणी करण्याकरिता नगरपरिषद कार्यालय यांना आदेश दिले होते. परंतु नगरसेवकांनी वेळोवेळी केलेले अर्ज आणि जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आदेश या गोष्टींची अजूनही पूर्तता झाली नाही. २८ जानेवारी २०२१ रोजी प्रभाग ३ मधील बालाजी मंदिर, झारे गल्ली व काद्री बागेतील तिन्ही ठिकाणची बोअर बंद आहेत. त्यामुळे नागरिकांची पाण्याची अडचण होत आहे. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक संजीत कोमटवार १८ फेब्रुवारी २०२१ रोजीपासून धारूर नगर पालिकेसमोर बेमुदत उपोषण करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली आहे.