३५ गावांत पोलीस पाटलांची नियुक्तीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:22 IST2021-06-20T04:22:48+5:302021-06-20T04:22:48+5:30
राम लंगे लोकमत न्यूज नेटवर्क वडवणी : तालुक्यातील वडवणी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ४६ गावे असून त्यातील ३५ गावांत पोलीस ...

३५ गावांत पोलीस पाटलांची नियुक्तीच नाही
राम लंगे
लोकमत न्यूज नेटवर्क
वडवणी : तालुक्यातील वडवणी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत ४६ गावे असून त्यातील ३५ गावांत पोलीस पाटलांच्या नियुक्त्या केल्या नाहीत. यामुळे येथील गावात काही भांडण, तंटे झाले तर त्यात लवकर समेट घडून येत नाही. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून ही पदे भरण्याकडे कानाडोळा होत आहे.
ग्रामीण भागात पोलीस पाटलांचे पद महत्त्वाचे समजले जाते. पूर्वीच्या काळापेक्षा पोलीस पाटील या पदाला सध्या स्थान मिळत नसले तरी भांडणतंट्यात गावपातळीवर समेट घडवून आणण्यासाठी पोलीस पाटलांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असते. मात्र, तालुक्यातील गावात आजघडीला पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर ही रिक्त पदे भरण्याची आवश्यकता आहे.
तालुक्यातील ४६ गावे एकाच पोलीस ठाण्याला जोडली गेली आहेत. भावकी, गावकीच्या भांडण, तंट्यात पोलीस पाटलाची भूमिका ही समन्वयाची आहे. त्यांच्या मध्यस्थीने बहुतांश प्रकरणे गावपातळीवर मिटविण्यासाठी यश मिळत असते. वडवणी तालुक्यातील रिक्त असलेल्या पोलीस पाटील भरती प्रक्रियेकरिता वरिष्ठ कार्यालयाकडून मंजुरी घेणे गरजेचे आहे. मात्र, या प्रक्रियेकडे तालुका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
...
...या गावांना पोलीस पाटील नाही
वडवणी, लक्ष्मीपूर, कान्हापूर, मामला, पिंपरखेड, मोरेवाडी, कवडगाव, काडीवडगाव, देवडी, डावरगाव, लिमगाव, चिचंवण, कोठारबण, पिंपळटक्का, पिंपळा, रूई, खडकी, देवळा, डोंगरेवस्ती, दमोधरवाडी, टोकेवाडी, तिगाव, चिंचाळा, चिंचवडगाव, धानोरा, केंडेप्रपी, पुनंदगाव, मोटेगाव, खापरवाडी, देवगाव, लवूळ नं.२, मोरवड, हिवरगव्हाण, उपळी, लोणवळ या ३५ गावांत पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत.
...
कामात विस्कळीतपणा
गावातील कायदा, सुव्यवस्था, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आवश्यक कागदपत्रे पुरविणे, गावच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना कळविणे, पोलिसांना गुन्ह्याच्या चौकशीत मदत करणे, नैसर्गिक आपत्तीची माहिती तहसीलदारांना कळविणे, संसर्गजन्य रोगांची साथ असल्यास त्याची माहिती देणे, गावच्या हद्दीत कोणी विनापरवाना शस्त्र बाळगल्यास ते काढून घेणे ही कामे पोलीस पाटील करीत असतात. परंतु त्यांच्या नियुक्त्याच नसल्याने कामात विस्कळीतपणा आला आहे.
....