धारूर घाटात ट्रकमधून मैदा, हळदीच्या पोत्यांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:26 IST2021-06-04T04:26:08+5:302021-06-04T04:26:08+5:30
धारूर : येथील घाटाच्या पायथ्याशी रस्त्याचे काम सुरू असल्याने वळण रस्त्यावर दोन वाहनांमधील माल लुटल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे घडला. ...

धारूर घाटात ट्रकमधून मैदा, हळदीच्या पोत्यांची चोरी
धारूर : येथील घाटाच्या पायथ्याशी रस्त्याचे काम सुरू असल्याने वळण रस्त्यावर दोन वाहनांमधील माल लुटल्याचा प्रकार गुरुवारी पहाटे घडला. दरम्यान, चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून, तीन संशयितांनाही ताब्यात घेतले.
धारूर येथील घाटाच्या पायथ्याशी राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी वळण रस्ता केलेला आहे. या वळण रस्त्यावरून पहाडी पारगाव येथील ट्रक (क्र. एमएच. २१ एक्स ५३९९) चाकण येथून लातूरकडे मैदा, हळदीची पोती घेऊन जात होता. मध्यरात्री ट्रक या वळणावर आला असता, गती कमी झाल्याचा फायदा घेत चोरटे ट्रकमध्ये चढले. ट्रकमधील ताडपदरी फाडून त्यातील मैद्याची पाच पोती बाहेर टाकली. पुढे डांबरी रस्ता सुरू झाल्याने आणखी एक पोते बाहेर टाकताच काही तरी पडल्याचा आवाज चालकाला आला. कुणीतरी आपल्या गाडीतील मैद्याची पोती काढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. परंतु भीतीपोटी चालकाने ट्रक वेगाने घाटाच्या वर आणला. त्यावेळी पोलीस वाहनाने गस्त घालण्यासाठी जात होते. चालकाने त्याच्या ट्रकमधील पोती चोरीला गेली आहेत आणि चोर घाटातच असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांची गाडी चोरांच्या शोधासाठी चोरी झालेल्या ठिकाणी वळणावर गेली असता, तेथे काही मैद्याची व काही हळदीची पोती दिसून आली. थोडे पुढे जाऊन शोध घेतला असता झुडपांमध्ये हळदीचे व मैद्याचे पोते दिसून आले.
यावरून चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी तीन तरुणांना संशयित म्हणूण ताब्यात घेण्यात आले. यात दोन धारूर येथील आहेत; तर एक मोहखेड येथील आहे.
ट्रकचालक रवींद्र पांडुरंग अंडील यांच्या फिर्यादीवरून तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धारूर येथील पोलीस कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत अवघ्या एक तासात मुद्देमालासह संशयित आरोपी ताब्यात घेतले आहेत. सहायक पोलीस उपनिरीक्षक गोविंद आष्टे, जमादार सय्यद खलील, पोलीस नाईक उल्हास नाईक, चालक गोरख खाडे, होमगार्ड मैंद यांनी ही कारवाई केली. याबद्दल सपोनि सुरेखा धस, केदारनाथ पालवे यांनी टीमचे कौतुक केले आहे.
===Photopath===
030621\img_20210603_111127_14.jpg