भरधाव खाजगी बसचा अचानक स्टेअरिंग रॉड तुटला; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2023 12:17 IST2023-04-10T12:17:13+5:302023-04-10T12:17:22+5:30
या अपघातात तीस प्रवासी बालंबाल बचावले

भरधाव खाजगी बसचा अचानक स्टेअरिंग रॉड तुटला; चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला
दिंद्रुड ( बीड) : अचानक स्टेअरिंग रॉड तुटल्याने खाजगी बस रस्त्याच्या खाली गेल्याची घटना रविवारी मध्यरात्री १२ वाजता घडली. यावेळी चालकाच्या प्रसंगावधानामुळे बसमधील ३० प्रवासी बालंबाल बचावले.
नांदेड येथील एक खाजगी ट्रॅव्हल्स (एम.एच.०९ सिव्ही ०७३६) पुणे येथे 30 प्रवासी घेऊन निघाली होती. माजलगाव तालुक्यातील दिंद्रुडजवळ बीड- परळी हायवे वर एका पुलाच्या शेजारी तिचा स्टेअरिंग रॉड तुटला. चालकाने प्रसंगावधान राखत तात्काळ गाडीवर कसाबसा ताबा मिळवत ब्रेक दाबत गाडी रस्त्याच्या बाजुला घेतली.
यावेळी काही प्रवाशांना किरकोळ मार लागला आहे. शेख रहमान गाडी मालकाचे नाव असल्याची माहिती चालकाकडून मिळाली. यावेळी सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही. गाडीचे प्रचंड नुकसान झाले असल्याचे दिसून आले. चालकाच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला.
लांब पल्ल्याच्या गाड्यांची नियमित तपासणी आवश्यक आहे. सदरील खाजगी बस जुनी असल्याचे निदर्शनास येत आहे. चालक-मालकाच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडतात. सुदैवाने यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र यापुढे चालक-मालकाने काळजी घेण्याची आवश्यक असल्याची चर्चा प्रवाशांत आहे.