सभापती पद 'ओबीसी महिला', पण गणच राखीव नाही! धारूर पंचायत समितीत मोठा पेच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 19:54 IST2025-10-13T19:53:58+5:302025-10-13T19:54:24+5:30
ओबीसी महिलांसाठी एकही गण नाही, तरी सभापती त्या प्रवर्गाचा कसा होणार?

सभापती पद 'ओबीसी महिला', पण गणच राखीव नाही! धारूर पंचायत समितीत मोठा पेच!
धारूर (बीड): स्थानिक राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या धारूर तालुका पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षणाची सोडत आज, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी तहसील कार्यालयात उत्साहात पार पडली. लहान बालकाच्या चिठ्ठीतून पारदर्शकपणे आरक्षण निश्चित करण्यात आले खरे, मात्र सभापती पदाबाबत निर्माण झालेल्या एका मोठ्या प्रशासकीय गोंधळामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे.
धारूर पंचायत समितीचे सभापती पद इतर मागासप्रवर्ग महिला (ओबीसी महिला) साठी आरक्षित करण्यात आले आहे. परंतु, आज जाहीर झालेल्या सहा गणांच्या आरक्षणामध्ये एकही गण इतर मागासप्रवर्ग महिला (OBC महिला) साठी आरक्षित झालेला नाही. जाहीर झालेल्या आरक्षणामध्ये मोहखेड गण अनुसूचित जाती महिलांसाठी, जहांगीर मोहा गण ओबीसीसाठी तर धुनकवाड आणि आसरडोह गण सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.
सभापती पद एका प्रवर्गासाठी आरक्षित असताना, त्या प्रवर्गासाठी एकही गण आरक्षित नसल्यामुळे, भविष्यात सभापती पदाचा उमेदवार निवडायचा कसा, असा मोठा प्रशासकीय आणि राजकीय पेच निर्माण झाला आहे. या गोंधळामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.
लहानग्याच्या हातून पारदर्शक सोडत
तहसीलदार श्रीकांत निळे, गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे यांच्या उपस्थितीत ही आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या निमंत्रणावरून एका लहान बालकाच्या हातून चिठ्ठ्या काढून आरक्षणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ, सरपंच, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी संपूर्ण प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
आता रंगत वाढणार!
या आरक्षण सोडतीमुळे धारूर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीची रंगत आता चांगलीच वाढली आहे. तेलगाव, भोगलवाडी, धुनकवाड, आसरडोह, मोहखेड आणि जहांगीर मोहा या गणांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, सभापती पदाचा पेच नेमका कसा सुटणार, याकडे आता संपूर्ण धारूर तालुक्याचे लक्ष लागले आहे. राजकीय नेते आणि प्रशासनाला या गोंधळावर लवकरच तोडगा काढणे अनिवार्य आहे.